मुंबई : अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर राशिद खानने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात राशिद सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. 19 वर्ष आणि 165 दिवसांचा असताना त्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं कप्तानपद मिळवलं.


अफगाणिस्तानचा कर्णधार असगर स्तानिकझाईला अॅपेन्डिसाइटिसचं निदान झाल्यामुळे विश्रांती देण्यात आली. त्यानंतर राशिदच्या नेतृत्वात अफगाण संघाने आयसीसी विश्वचषकाच्या क्वॉलिफायर्समध्ये स्कॉटलंड विरोधात सलामीचा सामना खेळला.
झिम्बाब्वेतील बुलावायोमध्ये हा सामना खेळवण्यात आला.

अफगाणिस्तानने या सामन्यात स्कॉटलंडकडून सात विकेट्सनी पराभव स्वीकारला. त्यामुळे कर्णधार म्हणून राशिदची सुरुवात फारशी आशादायक नसली, तरी एक विक्रम त्याच्या नावे जमा झाला आहे.

राशिद हा वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. आतापर्यंत 38 आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांमध्ये त्याने 87 विकेट्स घेतल्या आहेत, तर 29 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राशिदने 47 बळी टिपले आहेत.

यापूर्वी बांगलादेशचा रजिन सालेह वनडे संघाचा सर्वात तरुण कर्णधार होता. वयाची 20 वर्ष 297 दिवस पूर्ण केल्यानंतर त्याने कप्तानपदाची धुरा खांद्यावर घेतली होती. 12 सप्टेंबर 2004 रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात बांगलादेशचं नेतृत्व केलं होतं.