नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होणार आहे. बंगळुरुत हा सामना खेळवला जाऊ शकतो. बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संयुक्त बैठकीत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला हा ऐतिहासिक कसोटी सामना यावर्षी जूनमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होईल, अशी घोषणा बीसीसीआयने गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2017 मध्ये केली होती.

आयर्लंडसोबत अफगाणिस्तानने गेल्या वर्षी जूनमध्ये कसोटी खेळण्यासाठी मान्यता मिळवली आहे. उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आयसीसीचे पूर्णवेळ सदस्यही बनले आहेत. अफगाणिस्तानने गेल्या काही दिवसांपासून टी-20 आणि वन डेत शानदार प्रदर्शन केलं आहे.

आयसीसी रँकिंगमध्येही अफगाणिस्तान संघ टॉप 10 मध्ये आहे. टी-20 मध्ये अफगाणिस्तान 9 व्या, तर वन डे मध्ये अकराव्या स्थानावर आहे.