द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पंड्या मैदानावर होते. या दोन्ही फलंदाजांकडून भारताला बऱ्याच आशा होत्या. पण आपल्या धावसंख्येत अवघ्या 4 धावांची भर घालून पंड्या रनआऊट झाला. यामध्ये सर्वस्वी चूक पंड्याचीच होती. पंड्यानं एक सरळ फटका मारुन धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरुवातीलाच कोहलीनं पंड्याला नाही म्हणून सांगितलं. त्यावेळी पंड्या मागे फिरला. पण आपण क्रिझमध्ये आरामात पोहचू असा अतिआत्मविश्वास त्याला नडला. त्यावेळी फिलेंडरनं फेकलेला चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला. यावेळी पंड्या क्रिझच्या जवळ तर पोहचला. पण त्याचा पाय आणि बॅट दोन्हीही हवेत होतं. त्यामुळे त्याला बाद ठरवण्यात आलं.
ज्यावेळी भारतीय संघाला एका मजबूत भागीदारीची गरज होती तेव्हाच पंड्या अशाप्रकारे बाद झाल्यानं अनेकांनी त्याच्यावर टीका केली. यावेळी समलोचन करणाऱ्या सुनील गावसकर यांनी देखील ही चूक अक्षम्य असल्याचं म्हटलं.
दुसरीकडे माजी क्रिकेटर संजय मांजरेकरनं देखील हार्दिकवर टीका केली. 'आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये एक पुसटशी रेषा असते. आपण सचिन तेंडुलकरला पाहा तो किती प्रतिभावंत खेळाडू होता. पण त्याच्यात कधीही अंहकार नव्हता.'
दरम्यान, भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला. यावेळी कर्णधार कोहलीनं 153 धावांची शानदार खेळी साकारली.