अमेठी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचा लोकसभा मतदार संघ असलेल्या अमेठीत नाराज लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. राहुल गांधींचा ताफा रायबरेलीतील सलोनहून परसदेपूरकडे रवाना होताच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली, ज्यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राहुल गांधींचा हा पहिलाच अमेठी दौरा होता.

रायबरेलीतील विधान परिषदेचे आमदार दीपक सिंह वरिष्ठ पोलीस अधीक्षक शेखर सिंह यांच्याशी वाद घालतानाही दिसून आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना हाकलून लावण्यात आलं, ज्यावर भाजपचे स्थानिक आमदार दलबहादुर कोरी यांनी आक्षेप घेतला.

अमेठीतील राजीव गांधी चौकात राहुल गांधींना आंदोलनकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ज्यामुळे त्यांना वडिलांच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण करता आला नाही.

भाजपचे स्थानिक नेते आणि व्यावसायिक राजेश ‘मसाला’ यांनी राहुल गांधींना 'बेपत्ता खासदार' ही उपमा देत काही गंभीर आरोपही केले. राहुल गांधींनी आपल्या ट्रस्टसाठी शेतकऱ्यांची जमीन हडपली आणि अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप करण्यात आला.