AFG vs BAN दुबई: बर्थडे बॉय आणि मॅन ऑफ द मॅच राशिद खानच्या अष्टपैलू कामगिरीने, अफगाणिस्तानने बांगलादेशवर तब्बल 136 धावांनी धुव्वा उडवत आशिया चषकाच्या साखळीत दुसरा सनसनाटी विजय मिळवला. याआधी आशिया चषकाच्या ब गटात अफगाणिस्ताननं श्रीलंकेवरही 91 धावांनी दणदणीत मात केली होती. त्यापाठोपाठ बांगलादेशचा फडशा पाडून अफगाणिस्ताननं वन डे क्रिकेटमध्ये आपण कच्चं लिंबू राहिलो नसल्याचं दाखवून दिलं.

या सामन्यात अफगाणिस्ताननं 50 षटकांत सात बाद 255 धावांची मजल मारली होती. बांगलादेशला विजयासाठी 256 धावांचा पाठलाग करणं झेपलं नाही. अफगाण गोलंदाजांनी त्यांचा अख्खा डाव 42.1 षटकात अवघ्या 119 धावांत गुंडाळला.  या विजयामुळे अफगाणिस्तान ब गटात अव्वलस्थानी पोहोचला आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र एकवेळ अफगाणिस्तान 200 धावाही करु शकतं की नाही अशी परिस्थिती होती. मात्र राशिद खानने गुलबदिन नायबसोबत आठव्या विकेटसाठी तब्बल 95 धावांची भागीदारी केली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

राशिदने 32 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 57 धावा ठोकल्या. तर नायबने 38 चेंडूत 5 चौकारांसह 42 धावा केल्या.

फलंदाजीनंतर राशिदने गोलंदाजीतही कमाल केली. राशिदने 9 षटकं टाकली, यातील तीन षटकात एकही धाव न देता मेडन टाकली. तर केवळ 13 धावा देत 2 विकेटही घेतल्या. तसंच त्याने क्षेत्ररक्षण करताना एक धावबादही केला.

बांगलादेशी फलंदाजांना मोठी भागीदारी रचता आली नाही. फलकावर 43 धावा जमा झाल्या होत्या, तोपर्यंत नजमुल हुसेन (7), लिटन दास 6, मोमिनुल हक 9 आणि  मोहम्मद मिथून 2 धावा करुन बाद झाले होते.

यानंतर शाकिब अल हसन (32) आणि मोहमुदुल्ला (27) यांनी पडझड रोखण्याची प्रयत्न केला. या दोघांनी 36 धावांची भागीदारी केली. मात्र राशिदने आधी शाकिबचा मग मोहमुदुल्लाचा काटा काढत बांगलादेशला झटके दिले आणि अफगाणिस्तानचा विजय निश्चित केला.