नागपूर : नागपूर पोलिस आमच्या रक्षणासाठी आहेत, की गुन्हेगारांसोबत हितसंबंध जपण्यासाठी? असा प्रश्न सामान्य नागपूरकर विचारत आहेत. पोलिस आणि गुन्हेगारांच्या यारी दोस्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फक्त पोलिस दलातच नव्हे तर नागपूरकरांमध्येही कमालीची अस्वस्थता आहे. गुंड गात असलेल्या 'तेरे जैसा यार कहा...' या गाण्यावर पोलिस कर्मचारी थिरकताना दिसत आहे.


ऑगस्ट महिन्यातील एका क्लिपमध्ये काही सराईत गुन्हेगार एका पार्टीत नाचताना दिसत आहेत. मात्र त्यांच्यासोबत नागपूरच्या कोतवाली पोलिस स्टेशनचा एक कर्मचारीही नाचत आहे. पोलिस आयुक्तांनी आता या सर्व प्रकरणावर चौकशीचे आश्वासन दिलं आहे. मात्र सामान्य नागपूरकरांनी या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गाण्यावर थिरकणारे हे घनिष्ठ मित्र असल्याचं कोणाच्याही लक्षात येईल. हातात माईक घेऊन गाणारा गुंड होता आबू खान. 17 ऑगस्टला आबू खानचा वाढदिवस धूमधडक्यात साजरा झाला, तेव्हाचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नागपुरातून तडीपार करण्यात आलेल्या अशोक बावाजीसह छोटे-मोठे गुंड झाडून पार्टीला हजर होते. याच गुन्हेगारांसोबत आणखी एक जण थिरकत होता. तो म्हणजे नागपूर गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिस कर्मचारी जयंता शेलोट. या मित्रांची क्लिप व्हायरल झाली आणि पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले.

जयंता शेलोटच्या निलंबनाचा प्रस्ताव संबंधित झोन डीसीपींकडून सीपी कार्यलयात पाठवण्यात आला आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र नागपूर पोलिसांचं गुन्हेगारांसोबत साटंलोटं असल्याचं हे पहिलंच प्रकरण नाही.

6 फेब्रुवारी 2017

नागपूरच्या शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये चार कर्मचारी जुगार खेळत असतानाची क्लिप व्हयरल

18 फेब्रुवारी 2018

कारागृहातील गुन्हेगारांची बडदास्त ठेवणाऱ्या आठ पोलीस कमर्चाऱ्यांचं निलंबन

17 जून 2018

एका पडक्या इमारतीत 12 जण जुगार खेळताना पकडले, यामध्ये नागपूर पोलिसांच्या सहा कर्मचाऱ्यांचाही समावेश

खरंतर पोलिस आणि सर्वसामान्यांमध्ये संवाद झाला पाहिजे, मात्र त्याऐवजी पोलिसांची गुन्हेगारांशी मैत्री का होते? याचं आत्मविश्लेषण 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असं ब्रीदवाक्य असलेल्या पोलिसांनी नक्कीच करावं.