Gilchrist on Twitter : देशभरात कोरोनाच्या प्रकोपामुळं संकट वाढत चाललं आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने सर्व विक्रम मोडले आहेत. अशात देशात रेमडेसिवीर, ऑक्सिजनसह बेड्सची तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये यामुळं कठोर निर्बंध घातले आहेत. अशा स्थितीत देखील आयपीएल खेळवली जात आहे. देशावर एवढे मोठे संकट असताना आयपीएल कशासाठी असा प्रश्न आतापर्यंत अनेकांनी उपस्थित केला आहे. आता यावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने देखील ट्वीट केलं आहे. ज्याची चर्चा सुरु आहे.  


गिलख्रिस्टनं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,  भारताला माझ्या शुभेच्छा. कोरोनाची भीतीदायक वाढती संख्या. तरीही आयपीएल सुरू आहे. हे योग्य आहे का? प्रत्येक रात्री तुम्ही हे पाहून विचलित होता का? याबाबत आपले विचार काय आहेत. माझ्या प्रार्थना आपल्याबरोबर आहेत, असं अॅडम गिलख्रिस्टने म्हटलं आहे. 






देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून काल एकाच दिवसात देशात तीन लाख 46 हजार 786 रुग्णांची भर पडली. देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. गेल्या 24 तासात 2624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती आता 25 लाख 52 हजार 940 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात दोन लाख 19 हजार 838 रुग्ण बरे झाले आहेत. 


राज्यात आज 67,167 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज  67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के  झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.