मुंबई : राज्य सरकरने आमदारांना आमदार फंडातील एक कोटी निधी कोरोनासाठी खर्च करायची परवानगी दिली आहे. 1 मे पासून देशात वय वर्ष अठरावरील नागरिकांना लसीकरणाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी आपल्या आमदार निधीतील एक कोटी या लसीकरणसाठी वापरण्याची विनंती केली आहे. कॉंग्रेस आमदार अमीन पटेल यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना आमदार निधी चार कोटी पर्यंत वाढवून दिला. त्यातील एक कोटी हे कोरोना संदर्भात वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात ज्येष्ठ नागरिक आणि वय वर्ष 45वरील नागरिकाना केंद्र सरकार लस देण्यात येत होती.पण 1 मे पासून 18 वर्षवरील नागरिकांना लसीकरण करण्याची जबाबदारी राज्यांवर येणार आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील युवा वर्गाचे विनामूल्य लसीकरण करण्याची तयारी काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी दाखवली आहे. गरज पडली तर संपूर्ण चार कोटी आमदार निधी देखील मतदारसंघातील लसीकरणाच्या कार्यक्रमाला द्यायला अमीन पटेल यांनी तयारी दाखवली आहे. युवकांना मोफत लस दिली पाहिजे,त्याची जबाबदारी मी घेईन असं अमीन पटेल यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले..
1 मे पासून लसीकरण कशा पद्धतीने होणार,लस मोफत असणार का याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय होईल असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. गरीब घटकांना लस मोफत देता येईल पण ज्यांना परवडेल त्यांनी लस विकत घ्यावी असेही ते म्हणाले. त्यामुळे 18 वर्षवरील लसीकरणाबाबत राज्याला आपले धोरण ठरवायचे आहे. काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी आपल्या आमदार निधीचा वापर लसीकरणसाठी करावा अशी विनंती राज्य सरकारला केली आहे.
आमदारांनी आपल्या मतदारसंघातील लसीकरणाची जबाबदारी घेतली तरी राज्य सरकारवरील ओझे थोडे कमी होईल. त्यामुळे 1 मे नंतर वय वर्ष 18 वरील नागरिकांच्या लसीकरण हा महत्वाचा टप्पा आहे. राज्य सरकार यासाठी काय धोरणात्मक निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे