पाकिस्तानच्या दुसऱ्या डावाच्या 53 व्या षटकात फलंदाज अजहर अली अतिशय विचित्र पद्धतीने बाद झाला. एखादा फलंदाज अशापद्धतीने बाद होईल, यावर कोणालाही विश्वास बसणार नाही.
झालं असं की, अजहर अलीने ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पीटर सिडलने टाकलेला चेंडू ऑफ साईडला टोलवला. चेंडू सीमेजवळ गेला, पण चेंडू सीमापार गेला, असं समजून असद शफीक आणि अजहर अली हे दोघे पिचवर गप्पा मारत उभे होते.
इथेच दोघांकडून चूक घडली आणि मिचेल स्टार्कने सीमेजवळ चेंडू पकडून वीकेटकीपर टीम पेनकडे थ्रो केला. टीम पेनने कोणतीही चूक न करता थ्रो पकडून चेंडू स्टम्पवर लावला, ज्यामुळे अजहर अली धावचीत झाला.
अजहर अली बाद होण्याची पद्धत अतिशय बालिश होती. चेंडू न पाहताच चौकार समजून अजहर अली नॉन स्ट्राईकवर असलेल्या शफीकसोबत बोलण्यासाठी पिचच्या मध्ये येऊन उभा राहिला. दोन्ही फलंदाज बोलण्यात मश्गूल असताना, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेला आणि सीमेच्या काही अंतर आत थांबला.
स्टार्कने त्याच्या चुकीचा फायदा उठवत चेंडू टीम पेनकडे फेकला आणि पेनने वेळ न दवडता यष्टी उडवल्या. हे पाहून अजहर अली आश्चर्यचकित झाला आणि नेमकं काय घडलं हे त्यालाही समजलं नाही. अजहर 64 धावा करुन माघारी परतला.