रिओ दी जेनेरिओ: नेमबाज अभिनव बिंद्राचं रिओ ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात पदक थोडक्यात हुकलं. अभिनवला अंतिम फेरीत चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. पात्र फेरीमध्ये सातव्या स्थान पटकावत अभिनवनं अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम फेरीत त्याला पदक पटकावता आलं नाही.

 

ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दोन दिवसांमध्ये भारतीय नेमबाजांच्या पदरी निराशाच पडली होती. भारताला अभिनव बिंद्राकडून पदकाची मोठी आशा होती. मात्र, त्याचं पदक थोडक्यात हुकल्यानं त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. पहिल्या दोन दिवसात भारतानं एकही पदक पटकावलेलं नाही.

 

सुरुवातीपासून अभिनव पदकाच्या शर्यतीत होता. त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी अभिनव चौथ्या स्थानावर फेकला गेला आणि त्याचं पदक अगदी थोडक्यात हुकलं.

 

दरम्यान, नेमबाज गगन नारंगचं प्राथमिक फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. त्याला प्राथमिक फेरीत 23व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.