मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. आपण दमल्याचं सांगत एबीने निवृत्ती जाहीर केली, मात्र आयपीएलच्या मैदानात डिव्हिलिअर्सने हवेत उडी मारुन पकडलेला झेल पाहून तो थकलाय, असं कोण म्हणेल, हाच प्रश्न पडतो.


डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. एबी डिव्हिलियर्सनं सीमारेषेवर अॅलेक्स हेल्सचा झेल पकडून आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम जणू लागूच होत नाही, असं दाखवून दिलं. हवेत उंच उडी घेऊन झाडावर लटकणारा आंबा तोडावा, तसा डिव्हिलियर्सनं झेल पकडला. त्यामुळे बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीनं डिव्हिलियर्सला चक्क स्पायडरमॅनची उपमा दिली.

एबी डिव्हिलियर्सला मिस्टर थ्री सिक्स्टी का म्हणतात याची प्रचिती आयपीएलच्या रणांगणात पुन्हा आली. त्याच सामन्यात डिव्हिलियर्सनं अवघ्या 39 चेंडूंत 69 धावांची खेळी करताना चिन्नास्वामी स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू पोहचवला.



एबीच्या या खेळीला बारा चौकार आणि एका षटकाराचा साज होता. पण विशेष म्हणजे बंगळुरुने हैदराबादवर मिळवलेल्या सनसनाटी विजयात डिव्हिलियर्सची ही खेळी निर्णायक ठरली.

डिव्हिलियर्सनं 2004 साली दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या 14 वर्षांच्या कारकीर्दीनंतर आपण थकलो असल्याची प्रामाणिक कबुली त्यानं दिली. डिव्हिलियर्सनं 114 कसोटी, 228 वन डे आणि 78  ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.

डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय का घेत आहोत, हे एका व्हिडीओद्वारे ट्विटरवर जाहीर केलं.

"मी आता कंटाळलो आहे. शिवाय तरुणांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे या क्षणापासूनच मी क्रिकेटला अलविदा करत आहे" असं डिव्हिलियर्स म्हणाला.

एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

वन डे कामगिरी

सामने – 228
धावा – 9577
शतकं – 25
अर्धशतकं – 53

कसोटी कामगिरी

सामने – 114
धावा – 8765
शतकं – 22
अर्धशतकं – 46

टी-20 कामगिरी

सामने – 78
धावा – 1672
शतकं – 0
अर्धशतकं - 10
संबंधित बातमी :

ए बी डिव्हिलियर्सची धक्कादायक निवृत्ती!