Shaheen Afridi Babar Azam Video: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) यांच्यात काही आलबेल नसल्याचा दावा अनेक मीडियाद्वारे करण्यात येत होता. तसेच पाकिस्तानचा संघ दोन गटांमध्ये विभागला गेल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी केला होता. 


आता शाहीन अफ्रिदी आणि बाबर आझमचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान समोर आलेल्या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हिडिओमध्ये शाहीन आफ्रिदीने कर्णधार बाबर आझमला धक्का मारल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.


नेमकं काय घडलं?


शाहीद अफ्रिदी विकेट्स घेतल्यानंतर सेलीब्रेशन करतो. यावेळी मैदानातील सर्व खेळाडू शाहीन अफ्रिदीचं कौतुक करण्यासाठी एकत्र येतात. कर्णधार बाबर आझम देखील शाहीन अफ्रिदीचं कौतुक करण्यासाठी येतो. मात्र शाहीन अफ्रिदी त्याला नजरअंदाज करत धक्का देत पुढे जातो आणि इतर खेळाडूंसोबत आनंद साजरा करतो. मात्र, हा व्हिडीओ 2024 टी-20 वर्ल्ड कपचा आहे की अन्य कोणत्या सामन्याचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.


पाहा संपूर्ण व्हिडीओ-






शाहीन आफ्रिदीवर प्रशिक्षकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप-


नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये शाहीनने संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि इतर सपोर्ट स्टाफसोबत गैरवर्तन केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आरोप होऊनही शाहीनवर संघ व्यवस्थापनाकडून कारवाई का करण्यात आली नाही. 
जिओ न्यूजशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, "शाहीनने नुकत्याच झालेल्या दौऱ्यात प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाशी गैरवर्तन केले, परंतु वेगवान गोलंदाजाच्या वाईट वर्तनावर संघ व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई केली नाही." पुढे असेही म्हटले आहे की, “संघातील शिस्त राखणे ही व्यवस्थापकाची जबाबदारी होती, त्यामुळे शाहीनच्या गैरवर्तनानंतरही त्याच्यावर कारवाई का झाली नाही, याची चौकशी केली जात आहे.


गॅरी कर्स्टन नेमकं काय म्हणाले होते?


टी-20 विश्वचषकातील पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर गॅरी कर्स्टन यांनी खेळाडूंशी चर्चा केली. कर्स्टन संघात सामील झाल्यापासून त्यांना संघात एकता दिसली नाही. याबाबत कर्स्टन म्हणाले की, खेळाडू एकमेकांना साथ देत नाहीत. मी याआधी अनेक संघांसोबत काम केले आहे, परंतु याआधी खेळाडूंमध्ये एकीची कमतरता मला कधीच जाणवली नाही. कर्स्टन यांनी असे विधान केल्याचे दावे पाकिस्तानी मीडियाने केले आहेत. पाकिस्तान संघात एकता नाही, ते त्याला संघ म्हणतात, पण तो संघ नाही. ते एकमेकांना सपोर्ट करत नाहीत; सगळे वेगळे आहेत. मी त्यांच्यासोबत काम केले आहे. अनेक संघ पाहिले आहेत, पण मी अशी परिस्थिती पाहिली नाही. एवढं क्रिकेट खेळूनही या खेळाडूंना कोणता फटका कसा मारायचा हेही माहित नसल्याचे कर्स्टन म्हणाले होते. 


पाकिस्तान सुपर 8 मधून बाहेर


पाकिस्तानला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये तर भारताकडून 6  धावांनी पराभव स्वीकारला होता. यानंतरही पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा कायम होत्या. मात्र, आयरलँड विरुद्ध अमेरिका मॅच पावसानं रद्द झाली. त्यामुळं अमेरिकेला फायदा मिळाला आणि ते सुपर 8 मध्ये गेले. तर, कॅनडा आणि आयरलँडला पराभूत करुनही पाकिस्तान क्रिकेट संघाला घरचा रस्ता धरावा लागला.