बंगळुरु : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला 75 धावांनी लोळवलं. तुफान फटकेबाजी करणाऱ्या सुरेश रैनाने ठोकलेल्या एका षटकारामुळे चिमुरडा जखमी झाला. सुदैवाने चिमुरड्याला गंभीर दुखापत झाली नाही.


बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी हा सामना रंगला. सुरेश रैनाने लगावलेला सिक्सर स्टेडियममध्ये बसलेल्या 6 वर्षांच्या सतीशच्या डाव्या मांडीवर लागला. त्याला तातडीने स्टेडियममधल्या कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं.

प्राथमिक वैद्यकीय उपचार केल्यानंतर सतीश उर्वरित सामना पाहण्यासाठी परतही आला. 'त्याला हलकीशी दुखापत झाली होती. दहा मिनिटांनी त्याने उर्वरित सामना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आम्हाला त्याला परवानगी देण्याशिवाय पर्याय नव्हता.' असं डॉक्टर
मॅथ्यू यांनी पीटीआयला सांगितलं.

कुठलाही षटकार मान, छाती किंवा डोकं यासारख्या अवयवाला लागला असता, तर तो गंभीर ठरला असता, कारण सहा वर्षांची मुलं इतकी गंभीर दुखापत सहन करु शकत नाहीत, अशी भीतीही डॉक्टरांनी व्यक्त केली.

एप्रिल 2012 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पुणे वॉरिअर्समध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात दहा वर्षांच्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर चेंडू लागला होता.

बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारतानं इंग्लंडला विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं होतं. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतानं 20 षटकांत 6 बाद 202 धावांचा डोंगर उभा केला होता. बलाढ्य आव्हानासमोर इंग्लंडचा डाव 127 धावांवरच गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. सुरेश रैनाने 63 धावा ठोकल्या होत्या.

संबंधित बातम्या :


VIDEO: रैनाचा सुपर कॅच


चहल हिरो, टीम इंडियाचा इंग्लंडवर 75 धावांनी विजय!


चहल 6 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!


तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणातच मालिका खिशात, नाम है कोहली!