इंदोर: 1945-46 सालातील रणजी सामन्यातील उपांत्य फेरितील सामन्यांच्या आठवणींने आजही रामेश्वर प्रताप सिंह यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. 91 वर्षीय सिंह होळकर टीमच्या त्या खेळाडूंपैकी एक आहेत, ज्यांनी यशवंत क्लब मैदानवर आयोजित रणजी सामन्यात म्हैसूर संघाविरोधात खेळताना शतक झळकावले. या सामन्यात एकापाठो पाठ एक सहा खेळाडूंनी शतकी खेळी करून नवा विक्रम रचला होता.

 

या सामन्यावेळी सिंह यांच्यासोबतच होळकर संघाचे केवी भंडारकर (142), सीटी सरवटे (101), एमएम जगदाळे (164), सीके नायडू(101) आणि बीबी निंबाळकर (172) यांनी शतकी खेळी करून संघाला एक मजबूत स्थिती मिळवून दिली. या विक्रमातील सिंह व्यतिरिक्त इतर पाचही खेळाडूंचे निधन झाले आहे.

 

सिंह यांना नुकताच मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनने 'सीटी सरवटे लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

 

रणजीच्या उपांत्य सामन्यातील या सामन्यात सिंह आणि इतर पाचही जणांच्या या शतकी खेळीने होळकर संघाने 912 धावांचा डोंगर रचला होता. हा सामना होळकर संघाने एक इनिंग आणि 213 धावांनी म्हैसूर संघाला पराभूत केले होते.

 

या नंतर होळकर टीमची गाठ बडोदा संघासोबत पडली. या सामन्यातही होळकर संघाने उत्तम कामगिरी करून 56 धावांनी बडोदा संघाचा पराभव करून रणजी चषक पटकावला.