मुंबई : बीसीसीआयच्या सल्लागार समितीने टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी सहा नावं अंतिम केली आहेत. या सहा जणांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. उद्या (10 जुलै) दुपारी एक वाजता या सहाही जणांच्या मुलाखती घेतल्या जातील, त्यानंतर नाव घोषित केलं जाईल.

‘ही’ सहा नावं अंतिम यादीत

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांचा समावेश आहे.

या सहाही जणांची नावं अंतिम यादीत निवडण्यात आले आहे. यांची उद्या मुंबईत मुलाखती घेतल्या जातील आणि त्यानंतर अंतिम नावावर शिक्कामोर्तब होईल.

दरम्यान, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्या नावाचीच जोरदार चर्चा आहे. टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांशीही रवी शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत.

वाचा : रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक असतील : सुनील गावसकर


तर दुसरीकडे टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवागही अंतिम सहा जणांमध्ये आहे. सहवागने दोन ओळींचा बायोडेटा प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे पाठवला होता. शिवाय, आपलं नावचं खूप आहे, असेही सहवागने म्हटलं होतं.

आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कुणाची निवड होईल, याची उत्सुकता अवघ्या क्रिकेटविश्वाला लागली आहे.