पणजी : वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी दहाव्या दिवशी महाराष्ट्राची पदकांच्या द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. टेनिस, जलतरण, सायकलिंग, वुशू, स्क्वॉश आणि बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राने आज छाप पाडली. महाराष्ट्राने आतापर्यंत ६४ सुवर्ण, ५९ रौप्य आणि ५९ कांस्यपदकांसह एकूण १८२ पदके जिंकत पदकतालिकेतील पहिला क्रमांक कायम राखला आहे. सेनादल (५१ सुवर्ण, २२ रौप्य, २६  कांस्य, एकूण ९९ पदके) दुसऱ्या आणि हरयाणा सेनादल (४५ सुवर्ण, ३१ रौप्य, ४५ कांस्य, एकूण १२१ पदके) तिसऱ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंनी दुहेरीतील दुहेरी सुवर्णपदके जिंकून मने जिंकली. महिला दुहेरीत ऋतुजा भोसले आणि प्रार्थना ठोंबरे जोडीने आणि पुरुष दुहेरीत अर्जुन कढे आणि पूरव राजा जोडीने जेतेपद पटकावले. याशिवाय वैष्णवी अडकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  जलतरणात अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. महाराष्ट्र पुरूष संघाने सेनादलास पेनल्टी शूटआऊटद्वारा पराभूत केले आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र संघ २६ वर्षांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरी पोहोचला होता. महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने कांस्यपदक मिळवले. तसेच चार बाय १०० मीटर मिश्रित रौप्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणामध्ये रुपेरी सांगता केली.  ट्रक सायकलिंगच्या स्प्रिंट प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने सोनेरी यश मिळवले. या संघातील मयुरी लुटेच्या खात्यावर हे चौथे पदक जमा झाले. वुशू क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या श्रावणी कटकेने रौप्यपदक मिळविले. याचप्रमाणे स्क्वॉशमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत तमिळनाडूकडून पराभव पत्करल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
 
टेनिस - दुहेरीतील दुहेरी सुवर्णपदके
 
महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंनी शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुहेरीतील दुहेरी सुवर्णपदके जिंकून मने जिंकली. महिला दुहेरीत ऋतुजा भोसले आणि प्रार्थना ठोंबरे जोडीने आणि पुरुष दुहेरीत अर्जुन कढे आणि पूरव राजा जोडीने जेतेपद पटकावले. याशिवाय वैष्णवी अडकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऋतुजा आणि प्रार्थना जोडीने तेलंगणाच्या रश्मिका भमिडीपती आणि श्राव्या शिवानी जोडीवर ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अर्जुन-पूरव जोडीला कर्नाटकच्या आदिल कल्याणपूर आणि प्रज्ज्वल देव यांनी झुंजवले. पण तरीही अर्जुन-पूरव जोडीने ७-६, ६-३ असा विजय मिळवला. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात वैष्णवीने गुजरातच्या वैदेही चौधरीकडून ०-६, २-६ असा पराभव पत्करला. त्यामुळे तिची वाटचाल खंडित झाली. रविवारी ऋतुजा आणि अर्जुन मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. ऋतुजाचा रौप्यपदक विजेत्या संघातही समावेश होता. त्यामुळे तिला यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिसरे आणि अर्जुनला दुसरे पदक जिंकण्याची संधी असेल.
 
जलतरण - वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघास रोमहर्षक विजयासह ऐतिहासिक सुवर्णपदक
 
पुरुष गटात शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत महाराष्ट्र पुरूष संघाने सेनादलास पेनल्टी शूटआऊट (४-२)द्वारा १४-१२ (पूर्णवेळ १०-१०) असे पराभूत केले आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र संघ २६ वर्षांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरी पोहोचला होता. महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने कांस्यपदक मिळवताना कर्नाटक संघाचा १५-६ असा धुव्वा उडवला. महाराष्ट्र संघाने चार बाय १०० मीटर मिश्रित रौप्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणामध्ये शेवटच्या दिवशी रुपेरी सांगता केली. अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने जलतरणात एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. 


महाराष्ट्र व सेनादल यांच्यातील सामना विलक्षण रंगतदार झाला. सुरुवातीला ३-६ अशा पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र सरकारने उत्तरार्धात धडाकेबाज खेळ करीत पूर्ण वेळेत १०-१० अशी बरोबरी झाली. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये महाराष्ट्राने ४-२ असा विजय मिळविला त्याचे श्रेय महाराष्ट्राचा गोलरक्षक मंदार भोईरला द्यावे लागेल. त्याने अप्रतिम गोलरक्षण करीत सेनादलाच्या दोन खेळाडूंना पेनल्टीद्वारा गोल करण्यापासून वंचित ठेवले. पेनल्टी शूट आउटमध्ये महाराष्ट्र संघाकडून अश्विनीकुमार कुंडे, पियुष सूर्यवंशी, श्रेयस वैद्य व उदय उत्तेकर यांनी यशस्वी गोल केला. महाराष्ट्र महिला संघाने कांस्यपदकाच्या लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी कर्नाटकविरुद्ध १५-६ असा विजय मिळवला. त्याचे श्रेय कोमल किरवे (पाच गोल), मानसी गावडे (चार गोल) व राजश्री गुगळे (तीन गोल) यांना द्यावे लागेल. महाराष्ट्र संघाने पूर्वार्धात ९-३ अशी आघाडी घेतली होती. चार बाय १०० मीटर मिश्रित जलतरण प्रकारात पलक जोशी, हिबा चौगुले, मिहीर आम्ब्रे, व वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने ही शर्यत ४ मिनिटे, ०९.७५ सेकंदांत पार केली. या शर्यतीमध्ये शेवटी उतरलेल्या वीरधवलने वेगवान कौशल्याचा प्रत्यय घडवत महाराष्ट्राला चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आणण्यात यश मिळवले. ही शर्यत कर्नाटक संघाने ४ मिनिटे, ०३.८० सेकंद अशा विक्रमी वेळेत जिंकली.


जलतरणात २४ पदकांची कमाई
महाराष्ट्राने जलतरणामधील पोहणे या प्रकारात पाच सुवर्ण, आठ रौप्य व तीन कांस्यपदके, डायव्हिंगमध्ये एक सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्यपदके, वॉटरपोलोमध्ये एक सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राने  जलतरण क्रीडा प्रकारात ७ सुवर्ण, ११ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण २४ पदकांची कमाई केली. 


महाराष्ट्राची कामगिरी अभिमानास्पद- शिरगावकर
महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक विजेतेपद मिळवत राज्याचा नावलौकिक उंचावला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी सांगितले,
"सेनादलाचे खेळाडू वर्षभर एकत्र सराव करीत असतात. या उलट आपल्या संघातील खेळाडू वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकत्र येऊन स्पर्धेपूर्वी जेमतेम एकच महिना सराव करतात. ही गोष्ट लक्षात घेतली तर महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी अतिशय अभिमानास्पद आहे. अरुण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या महाराष्ट्र संघाने ३-६ अशा पिछाडीवर असूनही संयम आणि जिद्द ठेवीत विजयश्री खेचून आणली आहे. महाराष्ट्र संघातील प्रत्येक खेळाडू आणि सहाय्यक मार्गदर्शक यांचा या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे. या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच आमच्या महिला संघाने देखील कांस्यपदक जिंकून प्रेरणादायक कामगिरी केली आहे,’’ असे शिरगावकर यांनी सांगितले.

सायकलिंग - महिला संघाला स्प्रिंटमध्ये सोनेरी यश
 
महाराष्ट्राच्या महिला संघाने ट्रक सायकलिंगच्या स्प्रिंट प्रकारामध्ये सोनेरी यश मिळवले. या संघातील मयुरी लुटेच्या खात्यावर हे चौथे पदक जमा झाले. 
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील वेर्णा-बिर्ला बायपास एअरपोर्ट रस्त्यावर चालू असलेल्या ट्रक सायकलिंगच्या सांघिक स्प्रिंट प्रकारामध्ये मयुरी, सुशिकला आगाशे, आदिती डोंगरे आणि संज्ञा कोकाटे या चौकडीने ५१.१३च्या वेगासह ५२.८०७ सेकंद वेळ नोंदवत जेतेपद काबीज केले. मणिपूर संघाला (५०.०६च्या वेगासह ५३.९३० सेकंद) रौप्य तर अंदमान आणि निकोबार संघाला (४९.४१च्या वेगासह ५४.६४४ सेकंद) कांस्य पदक मिळाले.     
मयुरीच्या खात्यावर आता यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदके जमा असून, रविवार तिला पाचवे पदक जिंकण्याची संधी आहे.

वुशू - श्रावणीला रौप्यपदक

वुशू क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या श्रावणी कटकेने शनिवारी रौप्यपदक मिळविले. 
वुशू हा क्रीडा प्रकार सांडा व ताऊलू या दोन प्रकारात खेळला जातो. ताऊलू क्रीडा प्रकारात ताईजीजेन स्पर्धेमध्ये श्रावणीने रौप्यपदक जिंकले. २२ वर्षीय श्रावणी ही पुण्याची शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू असून आजपर्यंत तिने १५हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतला असून भरघोस पदके जिंकली आहेत. ती एमआयटी संस्थेमध्ये व्यवस्थापन शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिकत आहे. 
पुरुषांच्या विभागात विशाल शिंदेने शुक्रवारी ८५ किलो गटात कांस्यपदक मिळवले. औरंगाबादच्या या खेळाडूने प्रथमच या स्पर्धेत भाग घेतला होता आणि पदार्पणातच त्याने पदक जिंकण्याची किमया साधली. तो सीमा सुरक्षा दलात नोकरी करीत आहे. या स्पर्धेत काल रौप्यपदक जिंकणाऱ्या सलोनी जाधवनेदेखील प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता आणि पदार्पणातच तिला देखील रौप्यपदक मिळाले आहे. ती भारती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिकत असून आजपर्यंत तिने कनिष्ठ व वरिष्ठ गटात अर्ध्या डझन पेक्षा अधिक पदके जिंकले आहेत. महाराष्ट्राच्या या खेळाडूंना ज्येष्ठ प्रशिक्षक सोपान कटके तसेच संघाचे प्रशिक्षक अविनाश पाटील, महेश इंदापुरे, प्रतीक्षा शिंदे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

स्क्वॉश - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांना रौप्यपदके
 
महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला स्क्वॉश संघांनी अंतिम फेरीत तमिळनाडूकडून पराभव पत्करल्यामुळे शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष संघ सलग दुसऱ्या वर्षी रौप्यपदकाचा मानकरी ठरला. 
पुरुष गटाच्या अंतिम फेरीत तमिळनाडूने महाराष्ट्रावर २-० असा विजय मिळवला. महाराष्ट्राकडून दोन खेळाडूंनी पराभव पत्करले. महिला गटाच्या अंतिम फेरीतही तमिळनाडूने महाराष्ट्राला २-१ असे नामोहरम केले. महाराष्ट्र संघातील उर्वशी जोशीने विजय मिळवला, तर निरुपमा दुबे आणि अंजली सेमवाल अपयशी ठरल्या.


महिला संघाचे ऐतिहासिक पदक -प्रशिक्षक प्रदीप खांडरे
महाराष्ट्र महिला संघाने सर्वोत्तम कामगिरी करीत्त यंदा पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. गतवर्षी गुजरात येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघ कांस्यपदक विजेता ठरला होता. यंदा उर्वशी, निरुपमा आणि अंजली यांनी आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावत महाराष्ट्राला हे यश मिळवून दिले. मात्र अंतिम सामन्यात झुंज अपुरी ठरल्याने संघ उपविजेता ठरला. तरी या सामन्यातील महाराष्ट्र महिला संघाची कामगिरी कौतुकास्पद ठरली त्यामुळे हे पदक संघासाठी ऐतिहासिक ठरले आहे, अशा शब्दांत मुख्य प्रशिक्षक प्रदीप खांडरे यांनी विजेत्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला.

नेमबाजी - कांस्यपदकाची हुलकावणी

महाराष्ट्राच्या रुचित विनेरकर आणि अनिकेत खिडसे जोडीला नेमबाजीच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात कांस्यपदकाने हुलकावणी दिली. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र गटाच्या पात्रता फेरीत रुचिरा आणि अनिकेत जोडीला तीन प्रयत्नांत अनुक्रमे १९१, १९१, १८७ असे एकूण ५६९ गुण मिळाले. मग कांस्यपदकाच्या लढतीत मध्य प्रदेशच्या नॅन्सी सोलंकी आणि युगप्रताप सिंह राठोड जोडीने रुचिरा-अनिकेत जोडीला १७-७ असे पराभूत केले. याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्वी सावंत महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पात्रता फेरीचा अडथळा ओलंडण्यात अपयशी ठरली. तिला ५७६ गुण मिळवता आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेमबाजीची पाटी कोरी राहिली. 

हॉकी - महाराष्ट्राच्या पुरुष संघाची हरयाणाकडून हार

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हरयाणाकडून १-३ अशी हार पत्करली. पहिल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाचा हा पहिलाच पराभव ठरला. हरयाणाच्या गुरमुखने २९व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल केला. ४२व्या मिनिटाला मोर परदीप सिंग आणि ५२व्या मिनिटाला जोगिंदर सिंग यांच्या गोलमुळे हरयाणाकडे ३-० अशी आघाडी जमा झाली. ५९व्या मिनिटाला तालिब शाहने मैदानी गोल करीत महाराष्ट्राच्या खात्यावर पहिला गोल जमा केला. अ-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने चार सामन्यांपैकी तीन विजय मिळवले, तर एक पराभव पत्करला. त्यामुळे एकूण ९ गुण मिळवत उपांत्य फेरीतील स्थान नक्की केले आहे. 


महाराष्ट्राच्या महिला संघाने पंजाबला बरोबरीत रोखले 
अखेरच्या १० मिनिटांत केलेल्या दोन गोलच्या बळावर महाराष्ट्राने पंजाबला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३-३ असे बरोबरीत रोखले. प्रियांका वानखेडेने महाराष्ट्राकडून दोन गोल नोंदवले. 
या सामन्यात पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. दुसऱ्या सत्रात २२व्या मिनिटाला प्रियांकाने महाराष्ट्राचे खाते उघडले. २७व्या मिनिटाला अमनदीप कौरच्या गोलमुळे पंजाबने मध्यंतराला १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सत्रात ३७व्या मिनिटाला गुरजीत कौरने पेनल्टीद्वारे गोल करीत पंजाबकडे आघाडी नेली. चौथे सत्र अधिक रंगतदार ठरले. ४७व्या मिनिटाला रजविंदर कौरने मैदानी गोल करीत पंजाबची आघाडी ३-१ अशी वाढवली. महाराष्ट्र हा सामना गमावणार अशी चिन्हे दिसत होती. पण ५१व्या मिनिटाला प्रियांकाने पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने महाराष्ट्राचा दुसरा गोल केला. मग उत्तरार्धात कर्णधार अक्षता ढेकळेने पेनल्टी कॉर्नरद्वारे तिसरा गोल करीत महाराष्ट्राला बरोबरी साधून दिली.
ब-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने तीन सामन्यांपैकी एक विजय, एक पराभव आणि एक सामना बरोबरीत सोडवल्यामुळे फक्त ४ गुण मिळवले आहेत. महाराष्ट्राचा रविवारी कर्नाटकशी सामना होणार आहे. 
 
फुटबॉल - महाराष्ट्राचा मणिपूरकडून दारुण पराभव

महाराष्ट्राच्या फुटबॉल संघांने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या साखळी सामन्यात मणिपूरकडून ३-८ असा दारुण पराभव पत्करला. या सामन्यात महाराष्ट्राकडून अरफत ए याने हॅट्ट्रिक नोंदवली.

खो-खो - महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची विजयी सलामी 
 
महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील खो-खो क्रीडा प्रकारात विजयी सलामी दिली. दोन्ही संघांनी यजमान गोवा संघांवर मोठे विजय मिळवले. 
फोंडा येथील होंडा मल्टीपर्पज मैदानावर सुरू झालेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने गोवा संघावर ९०-१२ असा १ डाव ७८ गुणांनी दणदणीत धुव्वा उडवला. महाराष्ट्राकडून पायल पवार आणि प्रतीक्षा बिराजदार यांनी प्रत्येकी ३.३० मि. पळतीचा खेळ केला. संपदा मोरेने २.४० मि. संरक्षण करताना ४ गुण मिळवले तर प्रीती काळेने १.३० मि. संरक्षण करताना ४ गुण मिळवले. प्रियंका भोपीने २:२० मि. संरक्षण करताना २ गुण मिळवले, किरण शिंदेने आपली आक्रमणाची धार कायम राखत १२ गुण मिळवले तर पूजा फार्गाडे व प्रियांका इंगळेने प्रत्येकी १०-१० गुण संघासाठी वासून लेले. गोव्याकडून सावित्री गौडोने १.०० मि. संरक्षण केले.
महिला संघा पाठोपाठ पुरुष गटात महाराष्ट्राने गोवा संघावर ५६-१६ असा १ डाव ४० गुणांनी दणदणीत विजय साकारला. महाराष्ट्राकडून खेळताना कर्णधार रामजी कश्यपणे २.२० मि. संरक्षण करून २ गुण मिळवले. ऋषिकेश मुर्चावडेने २.०० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले. सुयश गरगटेने १.४० मि.  संरक्षण करून ४ गुण मिळवले तर आदित्य गणपुलेने २.०० मि. पळतीचा खेळ करत २ गुण मिळवले. ओमकार सोनवणे १.४० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवण्यात यश मिळवले. लक्ष्मण गवसने २.०० मि. संरक्षण केले. गोव्याकडून अनिकेत वेळीपने आक्रमणात ४ गुण वसूल केले तर प्रथमेश सपकाळने १.०० मि. संरक्षण केले. 
उद्घाटनीय पुरुषांच्या सामन्यात कर्नाटकने तेलंगणाचा ६०-२४ असा ३६ गुणांनी पराभव करीत चांगली विजयी सलामी दिली. महिलांच्या सामन्यात दिल्लीने हरयाणावर ५०-२८ असा ४.२५ मि. राखून २२ गुणांनी विजय  मिळवला.  
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉक्टर गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी आणि स्पर्धा संचालक डॉ. चंद्रजीत जाधव व तमाम खो-खो प्रेमी उपस्थित होते.

बॉक्सिंग - महाराष्ट्राचे चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल 
 
महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याचे आव्हान कायम राखले आहे.  महाराष्ट्राच्या ऋषिकेश गौडची गोव्याच्या प्रल्हाद पांडा याच्याशी गाठ पडणार आहे तर यश गौड याच्यासमोर पंजाबच्या आशुतोष कुमारचे आव्हान असणार आहे. एम.डी. राहीलला उपांत्यपूर्व फेरीत स्थानिक खेळाडू रजत याच्याशी खेळावे लागेल. सौरभ लेणेकरला सेनादलाच्या एस.पोखारियाशी झुंज द्यावी लागणार आहे.