सेन्चुरियन : रवीचंद्रन अश्विनची फिरकी आणि त्याला क्षेत्ररक्षणाची मिळालेली साथ यामुळे टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवसअखेर 6 बाद 269 धावांत रोखलं. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे.
पहिल्या दोन्ही सत्रात वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्माने एक विकेट घेतली. त्यानंतर हार्दीक पंड्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या हाशिम आमलाला धावबाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला.
दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर एडन मारक्रमने 15 चौकारांसह 94 धावांची खेळी उभारली. तर हाशिम आमलाने 82 धावांचं योगदान दिलं. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी कर्णधार फाफ ड्यू प्लेसी 24 आणि केशव महाराज 10 धावांवर खेळत होते.
भारतीय संघात तीन बदल
महत्त्वाचं म्हणजे या कसोटीसाठी भारताने तीन बदल केले आहेत.
विकेटकीपर रिद्धिमान साहाऐवजी पार्थिव पटेल, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारऐवजी ईशांत शर्मा आणि सलामीवीर शिखर धवनच्या जागी के एल राहुलचा समावेश करण्यात आला आहे.
असं असलं तरी अजिंक्य रहाणेला या सामन्यातही बाहेरच बसावं लागलं आहे.
टीम इंडियाला केपटाऊनच्या पहिल्याच कसोटीत लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली होती. त्यामुळं तीन सामन्यांच्या या मालिकेतलं आव्हान जिवंत राखायचं तर टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे.
केपटाऊनच्या त्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी खरं तर दोन्ही डावांत कामगिरी फत्ते केली होती. पण फलंदाजांच्या हाराकिरीने टीम इंडियाला चौथ्या डावात अवघ्या 208 धावांचा पाठलागही झेपला नाही. केपटाऊनच्या त्या लाजिरवाण्या पराभवाचं शल्य उरात बाळगून, विराट कोहलीची टीम इंडिया आता सेंच्युरियनच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
टीम इंडियाची गेल्या 25 वर्षांमधील दक्षिण आफ्रिकेतली कामगिरी ही अजिबात गौरवास्पद नाही. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत सहापैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारावी लागली आहे. उरलेली एकमेव कसोटी मालिका अनिर्णीत राहिली आहे. केपटाऊन कसोटीतला पराभव हा टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या 18 कसोटी सामन्यांमधला तब्बल नववा पराभव होता. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेतील आव्हान जिवंत राखण्याच्या इराद्याने सेंच्युरियनच्या रणांगणावर उतरावं लागत आहे.