भिवंडी : भिवंडी शहरात शॉर्ट सर्किटमुळे फ्रिजमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोट इतका भीषण होता, की या स्फोटात संपूर्ण किचन जळून खाक झालं, तर फ्रिजचे तुकडे उडाले.
भिवंडी शहरातील निजामपुरा परिसरात फ्रिजमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीत राहणाऱ्या 25 ते 30 रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि निजामपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी किचनमधून दोन सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.