ऋषी कपूरनी चाहतीला रडवलं, रणबीरकडून माफी
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2018 10:50 AM (IST)
ऋषी कपूरनी फोटो काढण्यास नकार दिल्यामुळे अवाक झालेल्या तरुणीच्या तोंडून 'किती हा उद्धटपणा' असे शब्द उमटले. हे ऐकताच ऋषी कपूर यांचा पारा चढला.
मुंबई : दिग्गज अभिनेते ऋषी कपूर ट्विटरवरील बेधडक आणि फटकळ ट्वीट्ससाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्यक्षातही त्यांचं वर्तन असंच काहीसं असल्याचा प्रयत्य एका चाहतीला आला. ऋषी कपूरनी झापल्यामुळे रडवेल्या झालेल्या या फीमेल फॅनला रणबीर कपूरने शांत केलं. रणबीर कपूर वडील ऋषी कपूर, आई नीतू सिंग, बहीण आणि भाची समारा यांच्यासोबत डिनरला गेला होता. मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये कपूर कुटुंब जेवत होतं. साहजिकच तिथे उपस्थित असलेल्यांना कपूर कुटुंबाला भेटण्याचा मोह आवरला नाही. रेस्तराँमध्ये कुटुंबासोबत जेवायला आलेल्या एका तरुणीने कपूर कुटुंबाच्या टेबलकडे धाव घेतली. प्रत्येकासोबत सेल्फी घेण्याची विनंती तिने केली. रणबीर आणि नीतू यांच्यासोबत तिने सेल्फी घेतले. मात्र उत्साहाच्या भरात ऋषी कपूर यांच्याकडे तिचं दुर्लक्ष झालं. 'चिंटू' सरांसोबत फोटो काढायचा राहिल्याचं लक्षात येताच, ती पुन्हा टेबलकडे आली आणि तिने ऋषी कपूर यांना सेल्फी घेऊ देण्याची विनंती केली. ही रिक्वेस्ट तर केवळ फॉर्मलटी आहे, ऋषी कपूर फोटोसाठी होकारच देणार, अशा विचाराने तिने मोबाईल हातात धरला, पण ऋषी कपूर यांनी चक्क नकार दिला. नकारामुळे अवाक झालेल्या तरुणीच्या तोंडून 'किती हा उद्धटपणा' असे शब्द उमटले. हे ऐकताच ऋषी कपूर यांचा पारा चढला. त्यांनी तरुणीला तिथेच झापायला सुरुवात केली. ऋषी कपूर ओरडल्यामुळे चाहतीला रडू फुटलं. हे पाहून रणबीरने मध्यस्थी केली. रणबीरने आधी तरुणीला शांत केलं, आणि तिची माफी मागितली. त्यानंतर ऋषी कपूर यांना गाडीकडे जाण्याची विनंती केली. ऋषी कपूर यांची आगपाखड यापूर्वी मीडियाने अनेक वेळा पाहिली आहे. त्यांच्या फटकळ ट्वीट्सच्या निशाण्यावर अनेक जण आले आहेत. मात्र आता वडिलांच्या बेधडकपणामुळे रणबीरवरच माफी मागण्याची वेळ आली.