ऑकलंड : न्यूझीलंड दौऱ्यातील दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा आठ विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली आहे. भारताने किवींचा डाव निर्धारित 20 षटकांमध्ये 158 धावांमध्ये गुंडाळला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान होतं. भारताने हे आव्हान 18.5 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला. रोहितने 29 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 50 धावा फटकावल्या. तर धवनने 30 धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयाचा पाया घातला. त्यानंतर रिषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

INDvsNZ : भारताची न्यूझीलंडवर 7 विकेट्सनी मात, मालिकेत बरोबरी


या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्रभावी गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला ऑकलंड ट्वेन्टी 20 सामन्यात 8 बाद 158 धावांचीच मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांनी आजच्या सामन्यात किवी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. पण कॉलीन डी ग्रॅण्डहोम आणि रॉस टेलरच्या 77 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. कॉलिनने 28 चेंडूत 50 आणि टेलरने 36 चेंडूत 46 धावांची खेळी उभारली. भारताकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक तीन फलंदाजांना माघार धाडलं. खलील अहमदने दोन तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.



न्यूझीलंडने वेलिंग्टनचा पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली होती. त्यामुळे या मालिकेतलं आव्हान राखायण्यासाठी टीम इंडियाला ऑकलंडमधील सामना जिंकणं गरजेचं होतं. अखेर भारताने हा सामना सात विकेट्सनी जिंकत मालिकेत बरोबरी केली.



भारतीय संघाला सलामीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात 80 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. निव्वळ धावांच्या फरकाचा विचार करायचा, तर ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासातला तो सर्वात मोठा पराभव ठरला.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, विजय शंकर, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, खलील अहमद

न्यूझीलंड संघ : केन विलियम्सन (कर्णधार), कॉलिन मुन्रो, टिम सेइफेर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, डार्ल मिचेल, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, मिशेल सँटनर, स्कॉट कुगलेजिन, टिम साउदी, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन