धरमशाला : टीम इंडियाने तब्बल 20 वर्षांचा दुष्काळ संपवताना न्यूझीलंडचा वर्ल्डकपमध्ये पराभूत केले. या विजयाचा शिल्पकार टीम इंडियाचे वेगवान त्रिमूर्ती मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि बुमराह राहिले. 274 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाने हे आव्हान पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. किंग कोहलीने पुन्हा टीम इंडियाच्या चेसची धुरा सांभाळताना 95 धावांची खेळी केली. त्याने 104 चेंडूत 95 धावांची खेळी आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर विजयाची औपचारिकता जडेजा आणि शमीने पूर्ण केली.
इतिहासाची साक्षीदार 'द वाॅल'; 20 वर्षांत दोनदा करून दाखवलं
टीम इंडियाने विजय मिळवताना एक ऐतिहासिक घटना घडली. तब्बल 20 वर्षापूर्वी झालेल्या वर्ल्डकपमधील सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला मात दिली होती. या सामन्यात सध्या टीम इंडियाचे गुरुजी असलेल्या राहुल द्रविड यांनी झुंजार 53 धावांची खेळी केली होती. कैफसोबत केलेल्या भागीदारीने टीम इंडियाला विजय मिळाला होता. त्याच विजयाची पुनरावृत्ती आज झाली आणि द वाॅल म्हणून क्रिकेट विश्वात प्रचलित असलेले राहुल द्रविड आज टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. राहुल द्रविड 2007 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे कॅप्टन होते. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या ज्युनिअर टीम इंडियाचे प्रशिक्षक होते आणि आता 2023 मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत.
2003 च्या वर्ल्डकपमध्ये त्या सामन्यात द्रविडची 53 धावांची खेळी
टीम इंडियाने 2003 मध्ये सौरभ गांगुली यांच्या नेतृत्वामध्ये 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला 40.4 षटकांत अवघ्या 150 धावांमद्ये गुंडाळले होते. त्या सामन्यात वेगवान गोलंदाज झहीर खानने भेदक गोलंदाजी करता 4 विकेट घेतल्या होत्या. अवघ्या 151 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात सुद्धा खराब झाली होती. न्यूझीलंडने भारताची अवस्था पाच षटकांत 3 बाद 21 केली. सलामीवीर सचिन, सेहवाग आणि नंतर कॅप्टन सौरभ गांगुली स्वस्तात बाद झाले. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी सध्या प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड आणि समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या मोहम्मद कैफ यांनी नाबाद भागीदारी करत सामना जिंकून दिला होता. मोहम्मद कैफने 68 धावांची खेळी केली होती, तर द्रविडने 53 धावांची खेळी केली होती. या सामन्यात चार विकेट घेणारा झहीर खान सामनावीर ठरला होता.
या सामन्यानंतर टीम इंडियाला कधीच आयसीसी स्पर्धेत विजय मिळवता आला नव्हता. 2019 मध्येही न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केले होते. त्यामुळे तब्बल 20 वर्षांनी टीम इंडियाच्या विजयाचे साक्षीदार राहुल द्रविड झाले आहेत. हा त्यांच्या कारकिर्दीमधील सर्वोच्च क्षण असेल, यात शंका नाही.
इतर महत्वाच्या बातम्या