मोहाली : भारताचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वन डे क्रिकेटमध्ये नऊ हजार धावांचा पल्ला ओलांडला. मोहाली वन डेत मिचेल सँटनरनं टाकलेल्या सतराव्या षटकादरम्यान धोनीनं वन डे क्रिकेटमधली आपली 9 हजारावी धाव काढली.
वन डेत नऊ हजार धावांचा पल्ला ओलांडणारा धोनी पाचवा भारतीय ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीननंच वन डेत 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.
ही कामगिरी बजावणारा धोनी हा श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट यांच्यानंतरचा तिसराच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
यष्टीरक्षणातही विक्रम :
धोनीनं यष्टीरक्षणातला आपला विश्वविक्रमही आणखी उंचावला आहे. धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीडशे स्टम्पिंग्जचा टप्पा गाठणारा पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मोहालीतल्या तिसऱ्या वनडे सामन्यात धोनीनं या विक्रमाला गवसणी घातली. धोनीनं 29 व्या षटकात अमित मिश्राच्या गोलंदाजीवर रॉस टेलरला यष्टीचीत केलं. मग 31 व्या षटकात ल्यूक राँकीलाही यष्टीचीत केलं.
धोनीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 151 यष्टीचीत बळी जमा आहेत. धोनीनं वन डेत 91 वेळा, कसोटीत 38 वेळा आणि ट्वेन्टी20 मध्ये 22 वेळा प्रतिस्पर्धी फलंदाजांना यष्टीचीत केलं आहे.