वाजतगाजत मिरवणूक, विधीवत पूजा; कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष
हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत्व देण्यात आले आहे. मात्र सांगेलीत फणसाला गिरोबा म्हणून दैवत्व दिले जाते. तळकोकणातल्या शिमगोत्सवाचा हा अनोखा थाट येथे पाहायचा तर सांगेलीत गेलंच पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहोळीच्या आदल्या दिवशी जुना गिरोबा देवालयातून काढल्यानंतर नवीन गिरोबा तयार करण्याची तसंच ढोलताशांच्या गजरात त्याला आणण्याची लगबग सुरु होते. सायंकाळी चारच्या सुमारास पूजा-अर्चा सुरु असलेले फणसाचे झाड तोडण्यात येते. झाड तोडल्यानंतर गुळगुळीत करण्यासाठी जिल्ह्यातील सुतार मंडळी स्वत:हून इथे हजर असतात.
सांगेली गाव म्हणजे निसर्गसंपन्न आणि विपुल अशा फणसाच्या झाडांची भूमी. या गावावर गिरोबाची कृपादृष्टी आहे, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. गिरोबा या दैवताची निर्मितीच फणसाच्या खोडातून होते. यामुळे फणसाचे झाड कुठेही दिसले तरी देव भेटल्याप्रमाणे गावातील माणसे त्याला नमस्कार करतात. या गावात फणसाच्या झाडावर होळीव्यतिरिक्त कधीही शस्त्र चालवले जात नाही.
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर गिरोबाचे स्थान निश्चित केले जाते. गावातीलच फणसाचे झाड निश्चित झाल्यावर दर रात्री या झाडाचे पूजन केले जाते. येथे भजन, कीर्तन कार्यक्रम असतातच. होळी सणाच्या आदल्या दिवसापर्यंत हा उपक्रम चालतो.
महाराष्ट्रात सर्वत्र होळी सण हा पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. सांगेलीत होळी सणाला सुरुवात होते ती महाशिवरात्रीपासून आणि गिरोबाचा उत्सवापासून आठ दिवस हा उत्सव सुरु राहणार आहे. या उत्सवात जिल्हावासियांबरोबर गोवा, कर्नाटक भागातूनही भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात.
तळकोकणात होळीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. अन्य गावात होळी जाळली जाते नाहीतर उभी तरी केली जाते. मात्र सांगेली गावात होळीऐवजी गिरोबाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते. यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात. दरवर्षी या देवाची प्रतिष्ठापना होते. प्रतिष्ठापनेवेळी मंदिर उलगडले जाते. राज्यातले असे हे एकमेव मंदिर आहे. ज्या मंदिरात देवतेची प्राणप्रतिष्ठा दरवर्षी होते.
गावात देव म्हणून फणसाच्या झाडाला गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री मंदिरात विधीवत पुरुन पूजा करण्यात येते. ग्रामदैवत झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर.
कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रुढी-परंपरा पाहायला मिळतात. गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. तळकोकणात होळीपासून सुरु होणारा शिमगोत्सव दीड, पाच, सात, पंधरा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा सावंतवाडीत सांगेली या गावात होळीच्या आदल्या दिवशी होळी उत्सव सुरु होतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -