ना अत्याधुनिक तंत्रज्ञान, ना इंजिनीअर; 350 वर्षांपूर्वीचा शिवकालीन पूल
महाडच्या दुर्घेटनेत ब्रिटीशांनी बांधलेला शंभर वर्षांपूर्वीचा पूल कोसळला आणि अनेकाचे बळी गेले. मात्र साताऱ्यातील एक पूल छत्रपती शिवरायाच्या इतिहासाची साक्ष तर देतोच, पण या नव्या युगातील इंजिनीअर्सनाही बोध देतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पावसाच्या सरी कोसळणारं सातारा जिल्ह्यातलं जावळीचं खोरं. याच पर्वतरागांमध्ये शिवरायांचा प्रताप सांगणारा प्रतापगड. मुसळधार पावसामुळे इथे कोयनेच्या उगमस्थानाच्या नदीला कायम महापूर. त्यामुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येताना ही कोयना नदी ओसंडून वाहत असायची.
या भागातून प्रवास करणं जिकीरीचं असल्यामुळे शिवाजी महाराजांनी या ठिकाणाची पाहणी करुन तत्कालीन पार्वतीपूर या गावात म्हणजे आताच्या पार या गावाजवळ पूल उभारला. 52 मीटर लांबीचा, 15 मीटर उंचीचा आणि आठ मीटर रुंदीचा हा पूल अवघ्या काही महिन्यांत उभारला गेला.
पाणी जाण्यासाठी बनवलेली कमानही मंदिराच्या गाभऱ्यासारखीच. कोरीव काम केलेल्या या पुलाला आज तब्बल साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली, पण हा पूल आजही त्याच दिमाखात इतिहासाची साक्ष सांगत लोकांसाठी उभा आहे. शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर कोकणात जाण्यासाठी होऊ लागला. कोकणातील सर्व दळणवळणाची कामं याच पुलावरुन होऊ लागली.
या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह मावळ्यांचा प्रवास पावसातही सुकर झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाला ना कोणतं अत्याधुनिक तंत्रज्ञान ना कोणता इंजिनिअर लागला. असा आखीव रेखीव पूल की सध्याच्या टाय घातलेल्या इंजिनीयरांनाही विचार कारायला लावणारा.
पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला, तोही एकदम मापात. ज्या बाजूने पाणी या पुलाखाली जाते, त्या प्रत्येक खांबाला धारदार कुऱ्हाडीसारख्या दगडी भिंती. पुरातील पाण्यासोबत आलेलं कोणतंही लाकुड या पुलावर आदळलं तरी त्याचे दोन भाग व्हावेत अशी ही कल्पना. पुरामुळे कोणता ओंडका आदळला तरी पुलाला कोणताच धोका नाही.
एकीकडे ब्रिटीशांनी बांधलेल्या पुलाची मर्यादा शंभर वर्षांपेक्षा जास्त नाही हे ते स्वतः पत्र पाठवून राज्य शासनाला कळवतात. आपल्या राज्यात बनवलेले अनेक पुल हाताच्या बोटावर मोजण्या इतकी वर्ष झाल्यावर कोसळल्याच्या घटना आहेत. त्यामुळे या शिवरायांच्या काळात बांधलेल्या पुलाकडून सरकारनं बोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -