श्रीलंकेचा सलग तिसरा पराभव, कांगारुच्या विजयाची बोहनी!
AUS vs SL Match Highlights: श्रीलंकेचा पाच विकेटने पराभव करत ऑस्ट्रेलियाने यंदाच्या विश्वचषकातील विजयाचे खाते उघडले आहे. श्रीलंकेने दिलेले 210 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने पाच विकेट 35.2 षटकात पार केले. जोश इंग्लिंश आणि मिचेल मार्श यांनी अर्धशतकी खेळी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीलंकेने दिलेल्या 210 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि अनुभवी स्टिव्ह स्मिथ स्वस्तात माघारी परतले. मधुशंकाच्या एकाच षटकात दोन्ही फलंदाज तंबूत परतले.
अनुभवी सलामी फलंदाज डेविड वॉर्नर फक्त 11 धावांवर तंबूत परतला. मधुशंकाच्या चेंडूवर डेविड वॉर्नरला एलबीडब्ल्यू देण्यात आले. तिसऱ्या पंचांनीही निर्णय कायम ठेवत वॉर्नर बाद असल्याचे सांगितले. त्यानंतर वॉर्नरला पेव्हेलियनमध्ये परत जावे लागले. पण पंचांनी बाद दिल्यानंतर वॉर्नर जोरात ओरडला अन् काहीतरी पुटपुटला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डेविड वॉर्नर तंबूत परतल्यानंतर अनुभवी स्मिथही फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. स्मिथलाही खातेही उघडता आले नाही. मधुशंका यानेच त्याला तंबूत पाठवले. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. पुन्हा त्यांना पराभवाचा धक्का बसणार की काय? अशी चर्चा सुरु झाली होती. पण मिचेल मार्श आणि इंग्लिंश यांनी अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला गेममध्ये परत आणले.
डेविड वॉर्नर आणि स्मिथ हे अनुभवी फलंदाज तंबूत परतल्यानंतर मिचेल मार्श याने एका बाजूला संयमी फलंदाजी केली. मिचेल मार्श याने लाबुशेनच्या साथीने धावसंख्या हलती ठेवली. मिचेल मार्श याने 51 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. मार्श बाद झाल्यानंतर जोश इंग्लिंश आणि मार्नस लाबुशेन यांनी डाव सावरला. दोघांनी धावसंख्या वाढवली.
संयमी फलंदाजी करणाऱ्या लाबुशेनला मधुशंका यानेच माघारी धाडले. लाबुशेन याने 60 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या.
जोश इंग्लिंश याने झंझावती अर्धशतक ठोकले. त्याने एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 59 चेंडूत 58 धावांची खेळी केली. वेल्लालागे याने इंग्लिंश याला तंबूत पाठवले.
पाच विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोसळणार की काय? असे वाटले होते. पण ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी झंझावती फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेल याने 21 चेंडूमध्ये दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. तर मार्कस स्टॉयनिस याने एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 20 धावांचे योगदान दिले.