EXCLUSIVE : तळकोकणातल्या घनदाट जंगलात आढळला दुर्मिळ 'वनमानव'

सिंधुदुर्गात स्लेंडर लोरिस हा अत्यंत दुर्मिळ प्राणी वन्यप्रेमींना आढळून आला आहे. रात्रीच्या वेळी हा प्राणी हुबेहूब माणसासारखा दिसत असल्यामुळे त्याला वनमानव म्हटलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मात्र या प्राण्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीची शक्यता असल्यामुळे याचं अचूक स्थान अत्यंत गुप्त ठेवलं गेलं आहे.

स्लेंडर लोरिस अर्थात वनमानव जंगलात आढळणे म्हणजे हे जंगल अद्यापही जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असल्याचं उदाहरण आहे. स्लेंडर लोरिस हा माकडाच्या प्रजातीतलाच एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे.
श्रीलंका आणि भारत या दोन देशात याचं मूळ आहे. वन्यजीव अधिनियम 1972 नुसार या प्राण्याचा 'शेड्यूल वन' म्हणजे अधिसूची क्रमांक एकमध्ये समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण भारतात तामिळनाडूत आणि अती पावसाच्या पश्चिम घाटातल्या घनदाट जंगलात या प्राण्याचं अस्तित्व आढळलं आहे.
सिंधुदुर्गात आंबोली , केसरी, फणसवडे, तळकट, झोळंबे या गावांच्या आसपासच्या जंगलात आणि तिलारीच्या घनदाट जंगलात काही जणांना आतापर्यंत हा प्राणी दिसला आहे.
अत्यंत हळू हालचाल करणारा हा प्राणी हूबेहूब एखाद्या लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला वनमानव म्हटलं आहे.
या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे. तसंच जादूटोणा, करणी, जारण मारण यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्लेंडर लोरिसला आंतरराष्ट्रीय तस्करीचा धोका आहे.
तामिळनाडूत अशाच प्रकारे या प्राण्याची तस्करी आणि शिकार झाल्यामुळे झपाट्याने याची प्रजाती कमी झाली आहे. म्हणून या प्राण्याचं सरंक्षण करण्यासाठी वन्यजीवप्रेमी आणि वनविभागाकडून अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे.