PHOTO : मालवणमध्ये आढळलेले 'लज्जागौरी' सदृश कातळशिल्प चिरेखाणीच्या विळख्यात
कोकणातील सड्यावर अनेक ठिकाणी कातळशिल्पे कोरलेली आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मालवण, कणकवली तालुक्यात अनेक ठिकाणी सड्यावर कातळशिल्प आढळतात. मालवण मधील खोटले गावच्या सड्यावर 35 हून अधिक कातळशिल्प आढळली आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर पडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखोटले गावच्या धनगरवाड़ी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले 'लज्जागौरी' सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे अशी शक्यता आहे. मात्र ही कातळशिल्प धोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे.
मालवणमधील खोटले धनगरवाडी सड्यावर आढळलेली कातळशिल्प पांडवांची चित्रे आहेत. मात्र ही कातळशिल्प धोक्यात आली आहेत. या परिसरात चिरेखाणींचे साम्राज्य पसरले आहे. या खाणींमध्ये कितीतरी पांडवांची चित्रे नष्ट झाली असे स्थानिकांचं मत आहे. याच ठिकाणी असलेल्या सुमारे 20 फूट लांब आणि 20 फूट रुंद कातळशिल्पावर चिरेखाणीतील खराब तुटके चिरे आणि माती टाकून दिल्याने ते अत्यंत महत्त्वपूर्ण कातळशिल्प मातीखाली गेली आहेत. कातळशिल्पांचे जतन करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य 12 अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच 20 फूट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते.
इथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. स्थानिक रहिवासी याला 'वेताळ' म्हणून ओळखतात. अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहे. याचठिकाणी एक गुहासुद्धा आढळली. मात्र आता ती मातीने भरली आहे.
खोटले येथे आढळलेल्या एका कातळशिल्पाचे 'लज्जागौरी' किंवा मातृदेवतेच्या मूर्तीशी विलक्षण साम्य आहे. हे शिल्प आश्चर्यकारक आहे. लज्जागौरी ही सुफलनाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. जगभरात एक काळ मातृसत्ताक पद्धतीचा होता असे मानले जाते. शिवाय स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या उत्पत्तीच्या शक्तीमुळे तिला हे सन्मानाचे स्थान दिले आहे.
लज्जागौरी ही देवता शिरविरहीत असते. डोक्याऐवजी कमळाचे फूल असते. ही देवी सुफलनाचे प्रतीक असल्याने ती जननस्थितीमध्ये दाखवली जाते. खोटले येथील हे कातळशिल्प आधुनिक काळातील लज्जागौरीशी विलक्षण साम्य दर्शवते. कदाचित आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे.