World Food Safety Day 2022 : जागतिक अन्न सुरक्षा दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

दरवर्षी 7 जून रोजी 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' म्हणजेच (World Food Safety Day) जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अन्न सुरक्षेबाबत जागरूक करणे हा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खराब झालेले आणि दूषित अन्न खाल्ल्याने दरवर्षी हजारो लोक आजारी पडतात. परिणामी गंभीर आजारांना बळी पडतात. याशिवाय प्रत्येक व्यक्तीला पुरेशा प्रमाणात सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे हा देखील अन्न सुरक्षेचा उद्देश आहे.

WHO च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर दरवर्षी प्रत्येक 10 पैकी एक व्यक्ती अन्नजन्य आजारांनी ग्रस्त आहे. चांगल्या आरोग्यासाठी सुरक्षित अन्न आवश्यक असले तरी असुरक्षित अन्नामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. खराब अन्न गुणवत्तेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्तीची वाढ आणि विकास प्रभावित होतो. यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगांसह मानसिक आजारांचा धोका वाढतो.
अन्नजन्य रोग सामान्यतः डोळ्यांना दिसत नाहीत आणि ते संसर्गजन्य, विषारी असतात. पीक उत्पादन, साठवणूक, वितरण, तयार करणे आणि खाणे या प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे, हा संदेश देणे हे जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट आहे.
WHO च्या मते, जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. दरवर्षी या दिनाची थीम ठरवली जाते. यंदाच्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' (Safer food, better health) अशी आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2018 मध्ये महत्त्वाच्या अन्न सुरक्षा मुद्द्याबद्दल जनजागृती वाढविण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिवस सुरू केला. जागतिक अन्न सुरक्षा दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) सदस्य देश आणि इतर भागीदारांच्या सहकार्याने संयुक्तपणे केली.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.