राज ठाकरेंची रणनीती नेमकी काय? मनसेच्या 'राज'कारणात गुरफटली महायुती आणि महाविकास आघाडी!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीनं समीकरणांची जुळवाजुळव केली असून निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पण, महाराष्ट्रातील निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या रणनितीनं सर्वांना धक्का दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंचा पक्ष 288 पैकी 139 जागांवर निवडणुका लढवत आहे. पण, प्रश्न असा आहे की, महायुती आणि महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या लढाईत राज ठाकरेंची मनसे 139 पैकी किती जागा जिंकू शकेल? किती जागांवर डिपॉझिट जप्त होईल की, त्या-त्या मतदारसंघातील दुसऱ्या पक्षांचा खेळ बिघडवण्यात यशस्वी ठरणार?
यंदाच्या विधानसभेच्या रिंगणात राज ठाकरे कंबर कसून उतरले आहेत. वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडत आहे. पण, राज ठाकरेंच्या सभांमधील भाषणात एक गोष्ट प्रामुख्यानं पाहायला मिळत आहे, ती म्हणजे, राज ठाकरे आपल्या भाषणांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका करत आहेत. पण, भाजपचा साधा उल्लेखही करत नाहीत.
अशातच आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, राज ठाकरे भाजपवर सातत्यानं टीका करणं टाळत आहे, मात्र, भाजपसोबत महायुतीत असलेल्या शिंदेंवर मात्र जोरदार हल्ला चढवत आहेत. यामध्ये भाजप आणि मनसेचा काही गेमप्लान तर नाही ना?
महाराष्ट्रात भाजप, शिंदे आणि अजित पवारांचं महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री पदाची माळ शिंदेंच्या गळ्यात आहे. असं असलं तरी, सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपला मात्र, याची काडीमात्र खंत नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत फक्त स्वतःचं सरकारच नाहीतर, स्वतःचा मुख्यमंत्रीसुद्धा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
भाजपला केवळ सर्वात मोठा पक्ष बनून चालणार नाही, तर बहुमताच्या इतक्या जवळ यावं लागेल, ज्यामुळे ते कुणाच्याच दबावाखाली येणार नाही. त्यामुळेच भाजप 148 जागांवर निवडणूक लढवत आहे. येथे बहुमताचा आकडा 145 आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरेंनी काही जागा जिंकल्या तर भाजपवरील दबाव कमी होईल.
महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या जागा कमी करून मनसे आणि अपक्ष आमदारांची संख्या वाढल्याचा थेट फायदा भाजपला मिळणार आहे. असं असलं तरी राज ठाकरेंना ना भाजप सरकारची अडचण आहे, ना भाजपचा मुख्यमंत्री होण्याशी, असंच चित्र दिसतंय.
मुंबईतील 36 जागांवर भाजप आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री दिसून येत आहे. विधानसभेच्या सात जागा अशा आहेत, जिथे राज ठाकरे यांनी भाजपविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत, तर त्यांचा सर्वाधिक प्रभाव फक्त मुंबईत आहे.
एवढंच नाहीतर भाजपकडून शिवसेनेतून निवडणूक लढवणाऱ्या शायना एनसी यांच्या विरोधातही राज ठाकरेंनी उमेदवार उभा केला नाही.
मुंबईच्या शिवडी विधानसभेच्या जागेवर महायुतीचा एकही उमेदवार नाही. इथून उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात मनसेचे बाळा नांदगावकर रिंगणात आहेत, तर भाजपनं हिंगणा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार समीर मेघे यांना तिकीट दिलं आहे. या विधानसभा जागेवर भाजपनं मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे.