Nashik News : 300 वर्षांची परंपरा असलेला 'बोहाडा' उत्सव, नाशिकमधील चांदोरीत जल्लोषात होतोय साजरा; पाहा फोटो
नाशिक जिल्ह्यातील गोदातीरी वसलेल्या चांदोरी गावात 'बोहाडा' अर्थात आखाडी उत्सव सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया उत्सवाला तब्बल 300 वर्षांची पारंपरिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.हळूहळू काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या या उत्सवास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभतोय.
आषाढ महिन्यात 'बोहाडा' उत्सवाला सुरुवात होते. तब्बल 13 दिवस हा उत्सव सुरू असतो.
सध्या निफाडच्या चांदोरीत बोहाडा या उत्सवाची धूम सुरू आहे. अंगाला झोंबणारा गार वारा, टेंभ्याचा चैतन्यदायी प्रकाश , संबळ, पिपाणी आणि डफ अशा पारंपरिक वाद्यांच्या तालावर लयबद्ध पदन्यास करीत नृत्य करणारी विविध देवदेवतांची सोंगे आणि शेवटी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघालेल्या देवीच्या सोंगाची घरोघरी पूजा केली जाते.
ग्रामस्थ अशा आगळ्यावेगळ्या वातावरण आणि जोडीला लोकनाट्य तमाशाच्या मेजवानीने ग्रामस्थांना बोहाडा उत्सवाने भुरळ घातली आहे.चांगले पर्जन्य आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बोहाडा उत्सवात यंदा वरच्या आळीला हा मान आहे. विशेष म्हणजे बोहाडा उत्सवात सोंग घेण्यासाठी गावकरी बोली लावतात.
शेवटच्या दिवशी गणपती, सरस्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबुमाळी, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्रमराजा, एकादशीदेवी-राक्षस, भस्मासूर-मोहिनी, इंद्रजीत-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासूर-शंकर, भीमा-जरासंध, रावण-राम लक्ष्मण, वीरभद्र-दक्षप्रजापती, नरसिंह-हिरण्यकश्यपू अशा सोंगांची मिरवणूक काढली जाते.
मिरवणुकीनंतर जगदंबा आणि महिषासुराच्या युद्धात त्याचा वध करून विजयी जगदंबा देवीच्या मिरवणुकीने यात्रेची सांगता होते.
तरुणाई देखील सोंगे घेण्यासाठी हिरीरीने भाग घेतात.यात मुलींचाही सहभाग तितकाच असतो. सर्व ग्रामस्थ बोहाडा उत्सव यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र एक करताना दिसतात.अवघं गाव या निमित्ताने एकवटतं.
इंटरनेट,मोबाईल, व्हिडीओ गेम,टीव्ही यांसारखे मनोरंजनाचे अनेक माध्यम उपलब्ध असताना ग्रामीण लोककला आणि संस्कृती असलेला बोहाडा उत्सव ही कला जिवंत ठेवण्याची करीत असलेली धडपड निश्चित पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.