यवतमाळ : न्यायाधीशांची फसवणूक करणारे सराईत गुन्हेगारांना यवतमाळच्या अवधुतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 15 लाख रूपयांचे पर्सनल लोन करून देण्याचे आमिष दाखवून एका न्यायाधीशांसह त्यांच्या भावाची तब्बल 75 हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला यवतमाळ पोलिसांनी दिल्लीतून  ताब्यात घेतले. ही कारवाई अवधुतवाडी पोलिसांनी पार पाडली असून परनीत सोनी प्रदिपकुमार सोनी उर्फ पुन्नी ( वय 23 रा. दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
 
विजय अटकरे (वय 34 रा. मंगलमुर्ती नगर, यवतमाळ ) यांनी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनूसार, विजय अटकरे यांना व्यवसाय करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामूळे विजय अटकरे यांचे भाऊ प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून नोकरीला असल्याने त्यांच्या नावाने पर्सनल लोन घेण्याचे ठरले. त्यानंतर पर्सनल लोनबाबत माहिती घेणे सुरू केले. यावेळी त्यांच्या मोबाईलवर कॉपीटल मुद्रा फायन्सकडून पर्सनल लोनबाबत एक मॅसेज आला. त्यावर आरोपींनी अटकरे यांना मॅसेज करीत मोबाईल नंबर दिला होता. यावेळी दोन्ही भावांमध्ये बोलणे झाल्यानंतर त्यांनी आवश्यक कागदपत्रे हस्ताक्षर करून आणि फोटो स्कॅन करून पाठविले. 


लोनसाठी आवश्यक कागपत्रे पाढवल्यानंतर आरोपींनी तुमचे 15 लाखाचे लोन मंजूर होईल, असे खोटे सांगून 19 हजार रूपये दर महिना भरावा लागेल असे सांगितले. तसेच दोन इंन्स्टालमेंट पहिले भरावे लागेल असेही सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरून आणि वेगवेगळ्या व्यक्तीने फोन करून अटकरे यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान स्विती सोनी हीच्या खात्यावर 38 हजार  आलोक कुमार याच्या खात्यावर 37 हजार रूपये पाठवण्यास सांगून अटकरे यांची  75 हजार रूपयांनी फसवणूक केली. 


या प्रकरणी  1 डिसेंबर 2021 रोजी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी विजयकुमार पाल (वय 40) आणि विनोद सोनी (वय 35) या दोघांना ताब्यात घेत संपूर्ण रक्कम हस्तगत केली होती. मात्र, यातील मुख्य सुत्रधार फरारच होता. त्यामूळे अवधुतवाडी पोलिसांचे एक पथक दिल्ली येथे फरार आरोपींच्या शोधात रवाना झाले होते. 


पोलीस पथकाने परनीत सोनी याला ताब्यात घेत चौकशीसाठी रविवारी यवतमाळमध्ये आणले होते. दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता, या प्रकरणात तोच मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले. ही कारवाई ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धिरेंद्रसिंग बिलवाल यांनी पार पाडली. परनीत सोनी याचे दिल्लीत कॉल सेंटर असून त्या ठिकाणी सात तरूणांसह तीन मुली देखील काम करीत होत्या. त्यामध्ये अमित, राहुल, साहिल, दिपक, अनिता आणि करिश्मा यांच्यासह एक तरूणीचा समावेश असून त्यांचाही शोध आता अवधुतवाडी पोलिसांनी सुरू केला आहे, अशी माहिती  पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली.