यवतमाळ: मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मागणारेच त्यांना मांडीवर घेऊन बसलेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे.  यवतमाळच्या नेर येथील सभेत मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) व खासदार भावना गवळी (Bhawana Gawali) यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात कडाडून तोफ डागली. राठोड यांच्यावरील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून त्यावेळी भाजपने केलेले गंभीर आरोप आणि खासदार गवळी यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यावरून अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 


संजय राठोड यांचा राजीनामा मागणारेच त्यांना मांडीवर घेऊन बसलेत. भाजपची महिला सुरक्षा हीच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राठोड हे निर्दोष असतील तर त्यांनी आरोप करणाऱ्या आक्रस्ताळेपणा करणाऱ्या महिलेवर अब्रूनुकसानीचा दावा का केला नाही.  त्या महिलेने गोरमाटी समाजाची माफी का मागितली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 


खुनी नराधमाला भाजपा सत्तेत घेऊन कशी बसू शकते? सुषमा अंधारेंचा सवाल


ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच मांडीवर घेऊन बसणाऱ्या  लाजा विकून खाल्या का?  खुनी नराधमाला भाजपा सत्तेत घेऊन कशी बसू शकते असे सवाल त्यांनी केले. जे लोक आपल्या श्रद्धेचा, भावनेचा बाजार मांडतायत आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्रावर खोट्या शपथा घेतात  असे लोक आम्हाला शहाणपण सांगत हिंदूत्व शिकवतात असाही टोला त्यांनी लगावला. खासदार भावना गवळी यांच्यावर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ फेम असा उल्लेख करत त्यांची खिल्ली देखील सुषमा अंधारे यांनी उडवली.


फडणवीस बावनकुळेंना साइडला करतायेत : सुषमा अंधारे


सुषमा अंधारे म्हणाल्या,  बावनकुळे हे ओबीसी असून, त्यांना साइडला ठेवण्याचा काम फडणवीस आणि टीम करत आहे. ही सनातनची प्रवृत्ती आहे. बावनकुळे हिंदूत्ववादी असते तर सर्वांना सांभाळून घेतले असते. ज्या पद्धतीनं बावनकुळे यांना साइडला केले जात आहे, त्याला सनातन म्हणतात. 


शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : सुषमा अंधारे


शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.  या दौऱ्यादरम्यान आर्णी दिग्रस मार्गावर एका कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताला भेट दिली सुषमा अंधारे यांनी कापूस वेचणाऱ्या महिलांसोबत संवाद साधला. यवतमाळ जिल्हा हा कापसाचा सोनं पिकवणारा जिल्हा आहे  यंदा कापूस पिकाने मार खाल्ला असून पेरा कमी झाला आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडतोय त्या निमित्ताने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी केली मुंबईतल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसलेल्या लोकांना शेतकऱ्याचे प्रश्न कळावे यासाठी मी पुढाकार घेईल असेही त्या म्हणाल्या. 


हे ही वाचा :


Sushma Andhare On Lalit Patil : ससून रुग्णालयावरच 'ऑपरेशनची' वेळ ललित पाटीलचा एनकाऊंन्टर होऊ शकतो; सुषमा अंधारेंचा मोठा दावा