Maharashtra Yavatmal News: यवतमाळमध्ये (Yavatmal News) नागपूर तुळजापूर महामार्गावर (Nagpur Tuljapur Highway) अज्ञात 10 ते 12 अज्ञातांनी एसटी बस (ST Bus) पेटवल्याची घटना घडली. बसमधील सर्व 73 प्रवासी सुरक्षित आहेत. विदर्भ-मराठवाडा (Vidarbha-Marathwada) सीमेवर उमरखेडजवळील पैनगंगा नदी (Painganga River) पुलावर हा प्रकार घडला. ही बस हातगाववरुन (Hatgaon) नागपूरकडे जात होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बस पेटवणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरू आहे.


नेमकं काय घडलं? 


नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील मार्लेगांव जवळ रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. बस पेटवली तेव्हा बसमध्ये 73 प्रवासी होते. प्रवासी तात्काळ बसमधून बाहरे आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व 73 प्रवाशी सुरक्षित आहेत. मात्र, लावलेल्या या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नांदेडच्या हातगाव आगाराची ही बस नागपूरकडे जात होती. त्याचवेळी मराठवाडा - विदर्भ सीमेवरच्या पैनगंगा नदीच्या पुलावर बसला थांबवत अज्ञात लोकांनी आग लावली आहे. या घटनेमागे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांचा हाथ असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन आधीपासूनच मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान, बस पेटवून देणारे नेमके कोण होते? याचा पोलीस शोध घेत आहेत.


दरम्यान, राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून गावागावात आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी गावागावा साखळी उपोषण केलं जात आहे. अशातच राजकीय नेत्यांना गावबंदीसोबतच काही गाड्यांची तोडफोडही केली जात आहे.             


राजकीय नेत्यांना गावागावातून विरोध       


मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच, गावात राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी आल्यास त्यांना विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ग्रामीण भागात देखील तापतांना दिसत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :           


Maratha Reservation : मराठा आणि कुणबी एकच? व्हायरल गॅझेटियरमध्ये नेमकं काय?