RBI :  आरबीआयकडून (RBI) यवतमाळ जिल्ह्यातील  बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेच्या (Babaji Date Mahila Sahakari Bank) व्यवहारावर पुन्हा तीन महिन्यांसाठी  निर्बंध आणले आहेत. बॅंकेची आर्थिक परिस्थिती न सुधारल्यानं पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी निर्बंध वाढवले आहेत. काल रात्री आरबीआयकडून  हा निर्णय घेण्यात आला आहे.   8 नोव्हेंबर 2021 रोजी कामकाज बंद झाल्यापासून सहा महिन्यांकरीता निर्बंध लागू केले होते, मात्र मे महिन्यात देखील परिस्थिती न सुधारल्यानं ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले होते. बँकेची आर्थिक परिस्थिती न सुधारल्यामुळे बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेवर आरबीआयकडून निर्बंध वाढवण्यात आले आहे.  


रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार,आता ग्राहकांना पुढील तीन महिने बँकेतून पैसे काढण्यासही मनाई केली आहे, या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.  त्यामुळे ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून बँक आर्थिक संकटाला सामोरे जात होती.  


बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेचे 8  नोव्हेंबर 2021 रोजी कामकाज बंद झाल्यापासून सहा महिन्यांकरीता निर्बंध लागू केले होते.  मात्र मे महिन्यात देखील परिस्थिती न सुधारल्यानं ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले होते. मात्र तरीही बॅंकेची आर्थिक परिस्थिती न सुधारल्यानं 9 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र असं जरी असलं तरी बँकेचे आर्थिक आरोग्य सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करु शकते.


बँकेवर 2021 साली 35 अ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.  आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बॅंक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करणार नाही. कुणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही, कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच  बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पाच हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम काढता येत नाही.


बँकेची सध्याची स्थिती पाहता ग्राहकांना बचत, चालू किंवा इतर खात्यांमधून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.  बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहतील. बँकेवर बंदी असली तरी   पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू ठेवतील.