NEET Re-Examination : यवतमाळ : नीट परीक्षेचा (NEET Exams) सावळा गोंधळ संपण्याची काही चिन्ह दिसेनात. नीटमधील घोटाळा (NEET Exam) समोर आला आणि विद्यार्थ्यांसह पालकांच्या पायाखालची जमीन हादरली. अशातच संपूर्ण देशभरात पसरलेल्या नीट परीक्षांच्या महाघोटाळ्याचा फटका आता यवतमाळमधील (Yavatmal) एका विद्यार्थींनीला बसल्याची माहिती मिळत आहे. यवतमाळमधील या विद्यार्थीनीनं मे महिन्यात नीट परीक्षा दिली होती. त्यानंतर घोटाळा उघडकीस आल्यानंतर पुन्हा पुर्नपरीक्षा घेण्यात आली. पण या विद्यार्थीनीनं ही परीक्षा दिलीच नाही. तरीदेखील तिची गुणपत्रिका बदलून मिळाली. त्याच तिच्या गुणांमध्ये कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका राजेंद्र डांगे या विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशासाठी मे महिन्यात नीट परीक्षा दिली होती. 4 जूनला निकाल लागून पहिल्या परीक्षेतील 720 पैकी 640 गुण मिळाले होते. त्यानंतर ऑल इंडिया रँकमध्ये 11 हजार 769 वर होती. मात्र, काही दिवसांतच नीट परीक्षेतील घोटाळा उघड झाला. या घोटाळ्यानं अख्खा देश हादरला.
नीट परीक्षेत भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (एनटीए) नं ग्रेस गुण मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची दुसऱ्यांदा परीक्षा घेतली. भूमिकानं ही परीक्षा दिलीच नव्हती. या परीक्षेसाठी तिनं साधा फॉर्मही भरलेला नव्हता. तरीदेखील भूमिकाचा गुणपत्रिकेत मात्र बदल झाला.
भूमिकांनी ही दुसऱ्यांदा परीक्षाही दिली नाही मात्र फेर परीक्षेच्या निकालानंतर भूमिकाची गुणपत्रिका बदलून मिळाली. त्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. नव्यानं आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण 640 वरून थेट 172 वर खाली आले आणि 11 हजाराच्या रँकवरून ती थेट 11 लाख 15 हजार, 845 व्या रॅकवर फेकली गेली. या नव्या गुणपत्रिकेमुळे तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे नीट परीक्षेतील भ्रष्टाचार आणि महाघोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे, एवढं मात्र नक्की.