Yawatmal News : दिवाळी (Diwali 2023) म्हणजे तिमिरातून तेजाकडे नेणारा सण. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक म्हणून देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. समाजातील सर्व स्थरांत दिवाळी हा मंगलमय, आनंददायी आणि मनामनात नवं चैतन्य निर्मण करणारा सण आप-आपल्या परीनं का होईना जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, तो प्रत्येकाच्यांच वाट्याला येतो असं नाही. याच भावनेतून यवतमाळच्या (Yawatmal) पुसद येथील माणुसकीची भिंत फाउंडेशननं वंचितांसोबत दिवाळी सण साजरा केला. शहरातील रस्त्यावर भटकणाऱ्या, गोरगरीब, वयोवृद्ध, वंचित नागरिकांची दाढी, कटिंग करून, त्यांना अभ्यंगस्नान घालून नवे कपडे देण्यात आले. तसेच, महिलांना साडी, लहान मुलांना कपडे आणि सगळ्यांना फराळ वितरित करून त्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं. गेल्या आठ वर्षांपासून माणुसकीची भिंत या संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.       


वंचितांच्या आयुष्यात फुलला आनंद        


अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. विविध रंगांचा, उत्साह, नवं चैतन्य निर्माण करत दिव्यांच्या झगमगटात संपूर्ण परिसर उजळून निघणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी साजरी करण्यामागे काही शास्त्रीय कारणांसह या सणाचं हिंदू पौराणिक मान्यतेनुसार,  अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंददायी ठरावा, या उद्देशानं यवतमाळच्या पुसद येथील माणुसकीची भिंत फाउंडेशननं अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी केली आहे. त्यांच्या या उपक्रमातून समाजातील गोरगरीब, वंचित वयोवृद्ध, रस्त्यावर भीक मागून आयुष्याची गुजराण करणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. माणुसकीची भिंत फाउंडेशनच्या वतीनं या नागरिकांना दाढी, कटिंग आणि त्यांना अभ्यंगस्नान घालून नवे कपडे देऊन ही दिवाळी साजरी केली आहे.         


मागील आठवर्षांपासून अनोखा उपक्रम        


दैनंदिन जीवन जगत असतांना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो. शिवाय इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवणं यासारखं दुसरं सुख नाही. याच उद्देशानं माणुसकीची भिंत फाउंडेशन गेली आठ वर्षे हा उपक्रम राबवीत आहे. या उपक्रमाद्वारे समाजातील बेघर लोकांना दिवाळीचा आनंद लुटता आला. या उपक्रमात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे  समाजातील अनेक गोरगरीब, वंचित वयोवृद्ध, रस्त्यावर भीक मागून आयुष्याची गुजराण करणाऱ्या नागरिकांची दिवाळी अधिक गोड झाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.