मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वातावरण असताना मूळ पुण्याचे असलेले योगेंद्र पुराणिक उर्फ योगी हे जपान मधील महापालिकेची ( कुगीकाई) निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले आहेत. भारतातील हजारो लोक जपानमध्ये राहायला सुरवात झाल्यापासून योगेंद्र पुराणिक हे पहिले भारतीय आहेत जे या निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले आणि विजयी देखील झाले.

बिगर जपानी आणि स्थानिक जपानी नागरिक यांच्यातला दुरावा कमी होऊन एकोपा वाढावा, जपानी स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला वाव मिळावा, भारतीय लोक जे जपानमध्ये राहतात त्यांचा पेंशनबाबतचे प्रश्न सोडवता यावे, यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

योगेंद्र पुराणिक हे कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान या पक्षाकडून ( CDP) निवडणूक लढले. हा पक्ष जपानमधील मोठा विरोधी पक्ष आहे.

टोकियोमध्ये एकूण 23 महापालिका आहेत. त्यातील एदोगावा मतदारसंघातून योगी निवडणूक लढवत जिंकले. या मतदारसंघात साडे चार हजार पेक्षा जास्त भारतीयांचा पाठिंबा त्यांना मिळाला आहे.

यासोबतच इतर स्थानिक जपान नागरिकांचा पाठिंबा योगेंद्र यांना मिळाला होता. योगेंद्र हे मूळ पुण्याचे असून 1997 साली शिक्षणसाठी जपानला गेले. त्यानंतर त्यांनी 2001 पासून आयटी क्षेत्रात 3 वर्ष, 10 वर्ष बँकिंग क्षेत्रात नोकरी करून आता जपानच्या राजकारणात उतरले आहेत.

ही निवडणूक 21 एप्रिलला झाली आणि त्याचा निकाल असून 22 एप्रिलला या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे भारतीयांचे त्यासोबतच तेथील स्थानिक जपानी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी योगेंद्र पुराणिक हे आता प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी सांगितलं.