कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियामध्ये दोन किलोमीटरचा पिझ्झा बनवण्यात आहे. जगातील सर्वात जास्त लांबीचा पिझ्झा अशी या पिझ्झाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी इटलीत बनवण्यात आलेल्या सर्वात जास्त लांबीच्या पिझ्झाचा विक्रमही कॅलिफोर्नियामधील या पिझ्झाने मोडला आहे.
कॅलिफोर्नियामधील ऑटो क्लब स्पीडवेमध्ये डझनभर शेफ आणि अनेक लोकांनी एकत्र येऊन रेकॉर्डब्रेक पिझ्झा बनवला. 1.93 किलोमीटर एवढी या पिझ्झाची लांबी आहे.
‘एफे’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, गिनीज बुकच्या प्रतिनिधींनीही या पिझ्झाला जगातील सर्वात जास्त लांबीचा पिझ्झा म्हणून गौरवले आहे.
हा पिझ्झा बनवण्यासाठी जवळपास 3 हजार 632 किलो पीठ, 1 हजार 634 किलो चीज आणि 2 हजार 542 किलो सालसा सॉसचा वापर करण्यात आला.
2016 साली इटलीमध्ये 6 हजार 82 फूट लांबीचा पिझ्झा बनवण्यात आला होता. त्यावेळी त्या पिझ्झाचीही गिनीज बुकमध्ये नोंद झाली होती. मात्र, आता कॅलिफोर्नियातील पिझ्झाने इटलीतील पिझ्झाचा लांबीचा विक्रम मोडला आहे.
पिझ्झा बनवण्यासाठी सलग आठ तास औद्योगिक ओव्हनचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे पिझ्झा बनवण्याच्या या कार्यक्रमात कुणीही सहभागी होऊ शकत होते. या कार्यक्रमातून मिळालेला पैसा फूड बँक आणि बेघर लोकांमध्ये वाटप केला जाणार आहेत.