बँकॉक : थायलंडचे पंतप्रधान प्रयूत चान ओचा यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "तोकडे कपडे घालणाऱ्या महिला रॅपर नसलेल्या चॉकलेटप्रमाणे असतात. रॅपर नसलेलं चॉकलेट लोकांना आवडत नाही," असं पंतप्रधान म्हणाले. तसंच देशातील महिलांनी अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालू नयेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.


 

थायलंडमध्ये लवकरच सोन्क्रानची सुरुवात होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. पारंपरिक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी थायलंडमध्ये सोन्क्रान साजरा केला जातो. या सणादरम्यान लोक एकमेकांवर पाणी उडवतात. मात्र यावेळी महिलांशी छेडछेडीचे प्रकारही घडतात.

 

त्याचनिमित्तान चान ओचा यांनी मंगळवारी बोलत होते. "सान्क्रोनदरम्यान महिलांनी योग्य कपडे परिधान करावे. थायलंडच्या संस्कृतीला साजेशे हे कपडे असावेत. या कपड्यांमध्ये महिला अधिक सुंदर आणि त्यांचा सभ्यपणा दिसेल. जे चॉकलेट चांगल्या रॅपरमध्ये गुंडाळलेलं असतं ते बराच काळ शेल्फवर ठेवतात," असं पंतप्रधान चान ओचा म्हणाले.

 

चान ओचा माजी लष्कर अधिकारी असून ते राजकीय विरोधकांवरील तिखट हल्ल्यासाठी ओळखले जातात. महिलांबाबत यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. थायलंडच्या बीचवर दोन ब्रिटीश महिला पर्यटकांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. बिकीनी घातल्यामुळे तर त्यांची हत्या झाली नाही ना, अशी शंका चान ओचा यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.