लंडन : विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजेला ब्रिटिश पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमेरिकेसह अनेक देशांची, राजकारण्यांची गोपनिय माहिती, कागदपत्रे आणि संभाषणं असांजेने विकिलिक्सच्या माध्यमातून जाहीर केली होती. त्यामुळे असांजेला अटक करण्यात यावी, अशी मागणी अनेक राजकारणी आणि संस्थांनी केली होती. अखेर वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानंतर असांजेला अटक करण्यात आली असल्याची माहिती मेट्रोपोलिटन पोलीस सर्व्हिसने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

असांजेने 2010 मध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे विकिलिक्सद्वारे सार्वजनिक केली होती. त्यानंतरही त्याने त्याचे उपद्व्याप सुरुच ठेवले. त्यामुळे त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली. परंतु अटकेपासून वाचण्यासाठी तो इक्वेडोरला गेला.

गेल्या सात वर्षांपासून असांजे हा इक्वेडोरच्या दूतावासात राहतोय. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्याला इक्वेडोरने नागरिकत्व दिले. कोर्टाच्या आदेशानंतर इक्वेडोरने असांजेला दिलेलं संरक्षण काढून घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याला दूतावासातून अटक केली.