एका पत्रकार परिषदेत बोलताना इम्रान खान म्हणाले की, भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास चर्चेला प्राधान्य दिलं जाईल. काँग्रेस विरोधकांकडून आपण घेरले जाऊ या भीतीने आमच्यासोबत चर्चा करण्यास घाबरेल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.जर भारतात पुढील सरकार काँग्रेसचे आले तर काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ते घाबरतील. मात्र जर भाजपची पुन्हा सत्ता आली तर या मुद्द्यावर निश्चितपणे तोडगा निघू शकतो.
इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी करत मोदी हे नेत्यानाहू यांच्याप्रमाणे भय आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत, असे म्हटले आहे.
इम्रान खान म्हणाले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या देशभक्तीच्या लाटेचा भाजपला फायदा मिळाला आहे. भारतात लोकसभा निवडणुकांच्या सर्व्हेंमध्ये हे स्पष्ट झाले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारत सरकारने तात्काळ दिलेल्या प्रतिक्रियेचा फायदा मोदी आणि भाजपला मिळाला आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. याउपर या निवडणुकीत जर मोदीविरोधी वातावरण निर्माण झाले असते तर भारताकडून पाकिस्तान विरोधात सैन्यबळाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता होती, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.
इम्रान खान म्हणाले की, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर उत्तर दिलं नाही तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही, असंही ते म्हणाले.
इम्रान यावेळी म्हणाले की, शेजारील अफगाणीस्तान, भारत आणि इराणसोबत शांतता प्रस्थापित करणे हे पाकिस्तानसाठी महत्वाचे आहे.
VIDEO | मोदींच्या प्रचार कार्डवर निवडणूक आयोगाचा 'सर्जिकल स्ट्राईक' | मुंबई | एबीपी माझा