इस्लामाबाद : तुम्ही निवडणुकीत कुणाला मत दिलं? हा सहज वाटणारा प्रश्न तुम्हाला थेट तुरुंगात घेऊन जाऊ शकतो किंवा, एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा भोगाव्या लागू शकतात. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात येईल. मतदान कुणाला केलं? हे विचारणं आणि बॅलेट पेपरचा फोटो घेणंही गुन्हा ठरणार आहे.
मतदाराला मतदान केंद्रावरुन पळवणं, मतदाराला मतदान करण्यासाठी किंवा न करण्यासाठी मजबूर करणं, कुणाला धमकी देणं, मतदाराचं अपहरण, भीती दाखवणं, कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने फूस दाखवणं, सरकारी फायदा मिळवून देणं, मतपेटीत बनावट बॅलेट पेपर टाकणं या कामांना गुन्ह्याच्या श्रेणीत टाकलं आहे.
वृत्तानुसार, मतदान करणं किंवा न करण्याच्या मतदाराच्या निर्णयावर भेटवस्तू देणं किंवा त्याला प्रभावित करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न करणं लाचखोरी मानलं जाईल. अधिसूचनेनुसार, जिल्हा निवडणूक अधिकारी, सत्र न्यायाधीश या प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींना तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा ठोठावू शकतात.