मुंबई : जगभरातील कोरोनाचा कहर सुरु आहे. सामान्यांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोरोनाची लागण झाली आहे. आता जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी स्वत: क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. "काही दिवसांपूर्वी मी अशा व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो, ज्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे," असं टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी सांगितलं आहे.


टेड्रॉस यांनी ट्विटरवरुन यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट केलं आहे की, "मी अशा व्यक्तीच्या संपर्कात आहे, ज्याची कोविड 19 च्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी पूर्णत: ठीक असून कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार मी येत्या काही दिवसांसाठी स्वत:च क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. घरातूनच मी काम करणार आहे."





त्यांनी पुढे लिहिलं आहे की, "आपण सर्व आरोग्य मार्गदर्शन सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. याद्वारे आपण कोविड 19 च्या प्रसाराची साखळी तोडून आरोग्य यंत्रणांचं रक्षण करु शकतो. WHO चे माझे सर्व सहकारी आणि मी जीव वाचवण्यासाठी आणि लोकांचं रक्षण करण्यासाठी एकजुटीने काम करत राहणार आहोत."





जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन
नुकतंच डब्ल्यूएचओने सर्व देशांच्या सरकारांना पाच मुख्य पावलं उचलण्याचं आवाहन केलं होतं. यानुसार ज्या देशांनी कोविड-19 चा प्रसार यशस्वीरित्या नियंत्रित केला आहे, त्यांना प्रसारचा स्तर कमी ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न करणे, सतर्क राहणे आणि त्वरित काम करण्यासाठी तयार राहणे या गोष्टी कराव्यात असं सांगण्यात आलं आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या आणि आयसीयूचा वापरण्याचा दर वाढत आहे, त्यांना लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.


जगभरातील चार कोटी 60 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. डिसेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा समोर आल्यानंतर कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत जगाती 12 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


WHO on Coronavirus | 81 देशांत कोरोनाची दुसरी लाट; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा