वॉशिंगटन : सूर्यमालेमधील गुरु हा आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे, या ग्रहाचा चंद्र 'युरोपा' म्हणून ओळखला जातो. या युरोपा ग्रहावर पाण्याचे बाष्प आढळल्याची माहिती अमेरिकी अंतरिक्ष संस्था 'नासा'कडून मिळाली आहे. गुरुच्या चंद्रावर पाणी आढळल्याने या उपग्रहावर मोठा समुद्र अस्तित्वात असल्याची शक्यता वैज्ञानिकांकडून दर्शवली जात आहे. गुरुच्या चंद्रावर पाणी असल्याची माहिती प्रथम नेचर अॅस्ट्रोनॉमी या जर्नलमध्ये प्रकाशित झाली.




अमेरिकेतील हवाई या शहरातील डब्ल्यू. एम. केक या वेधशाळेच्या मदतीने युरोपावरील पाण्याच्या बाष्पाचा अंदाज घेण्यात आला. युरोपा या उपग्रहावर पृष्ठभागावर हा बर्फ साचला असून कधीकधी फवाऱ्यांसारखं यातून पाणी बाहेर येतं याचे पुरावे संशोधकांकडे असल्याची माहिती आहे. मात्र पाण्याचे मॉलेक्युल्स मोजले नसल्याने गुरुच्या चंद्रावर खरंच पाणी आहे का याची खात्री देणं शक्य होत नव्हतं. मात्र नुकत्याच नासाने केलेल्या संशोधनामुळे गुरुच्या आतील रचनेचा अभ्यास करणे आणखी सोपं होणार असल्याचं नासाने म्हटलं आहे. जीवसृष्टीसाठी लागणारे आवश्यक घटक गुरुच्या चंद्रावर उपलब्ध असल्याची शक्यता नासाच्या संशोधकांनी वर्तवली आहे.

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था 'नासा'कडून याबद्दल ट्वीट करण्यात आलं, गुरुच्या चंद्रावर बर्फाळ पृष्ठभागावर पाण्याचे बाष्प असल्याची खात्री नासाकडून दिली गेली आहे.