मुंबई : चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा नासाने केला आहे. नासाने पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असं नासाने म्हटलं आहे. नासाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
चंद्राच्या सूर्यप्रकाशीत भागांतही पाणी असल्याचा शोध नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेनेलावला आहे. चंद्रावर पाणी सापडणे महत्त्वाचं असल्याचही नासाने म्हटलं आहे. चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादीत नसून, चंद्राच्या सूर्यप्रकाशीत पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याची माहिती या शोधातून समोर येत आहे.
अमेरिकी अंतरिक्ष संस्था 'नासा' ने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे. या शिवाय नासाने दोन अंतराळवीरांनाही 2024 पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे. जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल आणि त्या दृष्टीने हा शोध अत्यंत महत्त्वाचा असल्याचं नासाने सांगितलं आहे.
चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा हा सर्वात पहिल्यांदा भारतीय चंद्रयान-1 ने दिला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर किती पाणी आहे याविषयी सांगाताना नासाना म्हटले आहे की, सहारा वाळवंटात जेवढे पाण्याचे अंश असतील त्यापेक्षा 100 पटीने कमी पाण्याचे अंश चंद्रावर असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पाण्याचा अंश सापडणे ही शास्त्रज्ञांसाठी आशयकारक गोष्ट आहे.