Corona Vaccine कोरोना लसीकरण मोहिमेला काही महिन्यांपूर्वी जगभरात सुरुवात झाली. कमी- जास्त अंतरानं जगातील अनेक राष्ट्रांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. लस निर्मितीपासून लसीकरण मोहिमेपर्यंतच्या या प्रक्रियेत अनेक राष्ट्रांचं योगदान पाहायला मिळालं. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांमध्ये असणारा सलोखा आणि मैत्रीपूर्ण नात्याचंही यात दर्शन झालं. भारताकडूनही काही राष्ट्रांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्यात आला. यामध्ये भूतान या देशाचाही समावेश आहे. सध्या हा देश चर्चेत आहे ते म्हणते तेथे पार पडलेल्या विक्रमी लसीकरण मोहिमेमुळं. 


बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार भूतानमध्ये आतापर्यंत जवळपास 60 टक्के लोकसंख्येपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लस पोहोचली आहे. जवळपास आठवडाभरापूर्वी हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या या देशात लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली होती. 


भारत आणि चीनदरम्यान, असणाऱ्या या राष्ट्रात लोकसंख्येच्या 770,000 पैकी 470,000 जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. भारताकडून देण्यात आलेल्या कोविशील्ड लसीचा डोस यावेळी देण्यात आला. एएफपीच्या सर्वेक्षणानुसार भूताननं इस्रायल, संयुक्त अरब अमीरात या देशांप्रमाणंच अतिशय वेगानं लसीकरण मोहिम हाती घेत ती यशस्वी मार्गानं पार पाडली आहे.  


लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली, त्या क्षणापासून भूतानमध्ये गरोदर महिला, बाळाला नुकत्याच जन्म दिलेल्या माता, लहान मुलं आणि गंभीर आजार असणारे रुग्ण वगळता इतर सर्वांनाच लस देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. 


Corona Vaccine | अमेरिकेच्या लष्कराने विकसित केलेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात


आनंदी देशांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या भूतानच्या आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या इथं 70 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसोबत विकलांग नागरिकांना लस देण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत या देशात 896 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यामध्ये एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


लसीकरण मोहिमेवरुन भारतात मात्र वेगळंच चित्र 


भारतातील महाराष्ट्र राज्याला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील राज्यात फक्त 3 दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली होती. यावरुन राज्य सरकार आणि भाजपमध्ये कलगीतुरा सुरु आहे. अशातच आता राज्य सरकारच्या या दाव्यांवरून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत.