ह्युस्टन : अमेरिकेतील डलासमधील रेस्टॉरंटमध्ये एका वेटरला आपल्या चांगल्या कामाचं बक्षीसही तितकंच मोठं मिळालं आहे. एका ग्राहकाने टिप म्हणून तब्बल 500 अमेरिकन डॉलर (सुमारे 34 हजार रुपये) दिले. डलासमधील एप्पलीबी रेस्टॉंटमध्ये काम करणाऱ्या कासे सिमोन्सला ही कधीही न विसरता येणारी टिप मिळाली आहे.
ग्राहकाने रेस्टॉरंटमध्ये सर्वात स्वस्त मिळणारं फ्लेव्हर्ड पाणी ऑर्डर केलं होतं. या फ्लेव्हर्ड पाण्याची किंमत 0.37 डॉलर एवढीच होती. ग्राहकाने टिपसोबत एका नॅपकीनवर एवढी मोठी रक्कम टिप म्हणून देण्याचं कारणही लिहून ठेवलं होतं.
ग्राहकाने लिहिलेलं कारण असं होतं की, एक दिवसाआधी वेटर सिमोन्स हा एका ग्रोसरी स्टोअरमध्ये सामान खरेदी करत होता. त्यावेळी सिमोन्सची नजर एका वृद्ध महिलेकडे गेली, जी चिंतेत असल्याचं सिमोन्सला दिसली. इतर काहीजण त्या वृद्ध महिलेच्या बाजूने निघून गेले. मात्र, सिमोन्सने तिच्याजवळ जाऊन तिच्याशी चर्चा केली आणि चिंतेचं कारण विचारलं. त्यानंतर सिमोन्सने त्या वृद्ध महिलेशी बोलून तिची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आणि तिने खरेदी केलेल्या सामानाचे पैसेही स्वत: सिमोन्सनेच दिले.
विशेष म्हणजे, सिमोन्सला रेस्टॉरंटमध्ये टिप देणारं ग्राहक दुसरं तिसरं कुणी नव्हतं, तर त्या वृद्ध महिलेची मुलगीच होती.
वृद्ध महिला त्या दिवशी दुकानात सामान खरेदी करताना चिंतेत होती. कारण त्या दिवशी तिच्या पतीची तिसरी पुण्यतिथी होती. त्यामुळे वृद्ध महिला प्रचंड नाराज होती. मात्र, सिमोन्सने मदत केल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर काहीप्रमाणात आनंद दिसू लागला. आणि हेच पाहून वृद्धेच्या मुलीने सिमोन्सला बक्षीस देण्याचं ठरवलं होतं.
टिपची रक्कम पाहून आणि सोबत नॅपकीनवर लिहिलेला मजकूर वाचून सिमोन्स प्रचंड गहिवरला.