मुंबई : सध्याच्या काळात व्हॉट्सअप मेसेंजिंगच्या माध्यमातून जग अतिशय जवळ आलं आहे. हे मेसेज म्हणजे आपल्या जीवनाचा नियमित भागच झालं आहे. त्या आधी फिचर फोनच्या माध्यमातून टेक्स्ट मेसेज करण्यात येत होते. पण तुम्हाला माहिती आहे का जगातला सर्वात पहिला मेसेज कोणी आणि कधी केला होता? आजपासून 30 वर्षांपूर्वी 1992 साली जगातला पहिला टेक्स्ट मेसेज करण्यात आला होता. आता या मेसेजचा लिलाव करण्यात येणार आहे. व्होडाफोनच्या वतीने हा लिलाव करण्यात येणार आहे. 


जगातला पहिला टेक्स्ट मेसेज हा व्होडाफोन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला होता. व्होडाफोनच्या कर्मचाऱ्याने 3 डिसेंबर 1992 रोजी हा टेक्स्ट मेसेज केला असून तो 'मेरी ख्रिस्मस' (Merry Christmas) असा होता. या मेसेजमध्ये 14 अक्षरे होती. नील पापवर्थ या कर्मचाऱ्याने न्यूबेरी बर्कशायरमधील रिचर्ड जार्व्हिसला हा पहिला मेसेज केला होता. व्होडाफोन कंपनीकडून शॉर्ट मेसेज सर्व्हिस म्हणजे एसएमएस सेवावर काम सुरु होतं. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रयोग करण्यात आला होता. 


त्याच्याच पुढच्या वर्षी नोकीया कंपनीने एसएमएस फीचरची सुविधा उपलब्ध करुन दिली आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. 


आता या मेसेजचा लिलाव येत्या 21 डिसेंबरला फ्रान्समधील ऑगटर्स ऑक्शन हाऊस या ठिकाणी होणार आहे. यातून जे काही पैसे मिळतील ते संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सी  (United Nations Refugee Agency- UNRA) ला देण्यात येणार आहेत. या मेसेजला लिलावासाठी 1 कोटी 71 लाख रुपयांची किमान मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला या मेसेजच्या सेंडर आणि रिसिव्हरची एक डिजिटल फाइल देण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :