मुंबई : असं म्हणतात कुत्रे जगातील सर्वात इमानदार प्राणी आहे. जर कोणी कुत्रा पाळला, तर काही दिवसांतच तो आपल्या घरातील सदस्य होतो. अमेरिकेतील नॅशविलेमधील एक व्यक्ती आणि त्याच्या पाळीव कुत्र्याचं अनोखं नातं सध्या चर्चेत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या बिल डोरिस नावाच्या एका व्यक्तीचं आपला कुत्रा लुलूवर खूप प्रेम होतं. या व्यक्तीने त्याच्या पश्चात आपल्या कुत्र्यांच्या नावावर 5 मिलियन डॉलर याने जवळपास 36 कोटी रुपयांची संपत्ती केली आहे. व्यावसायिक असलेल्या बिल डोरिसचं आपला कुत्रा लुलूवर प्रचंड प्रेम होतं. गेल्या वर्षी बिलचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात लुलूला कोणताच त्रास होऊ नये म्हणून आपल्या संपत्तीतील मोठा वाटा त्याच्या नावावर केला आहे.


ट्रस्टमार्फत मिळतो लुलूच्या देखभालीचा खर्च


बिल डोरिसने यासाठी एक ट्रस्टची स्थापना केली आणि त्यामध्ये 50 लाख डॉलर्स जमा केले होते. ट्रस्टमध्ये जमा करण्यात आलेल्या या पैशांमधून लुलूची देखभाल करण्यात येते. डोरिसने लुलूला आपली मैत्रिण मार्था बर्टनकडे सोपवली आहे. डोरिस यांच्या मृत्यूपत्रानुसार, बर्टनला लुलूच्या देखभालीसाठी या ट्रस्टमध्ये जमा करण्यात आलेल्या पैशांमधून मासिक खर्च देण्यात यावा. दरम्यान, बर्टन आपल्या मर्जीने या पैशांचा वापर करु शकत नाहीत. मृत्यूपत्रानुसार, ट्रस्टमधून लुलूच्या देखभालीसाठी बर्टन यांना काही रक्कम देण्यात येणार आहे.


बिल डोरिस यांच्या एकूण संपत्तीचा अद्याप खुलासा नाही


बर्टन यांनी म्हटलं की, "मला माहिती नाही की, डोरिस यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे. मात्र त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे." त्या म्हणाल्या की, "बिल डोरिस यांचं आपला कुत्रा लुलू याच्यावर खूप प्रेम होतं. मला माहिती आहे की, लुलूच्या नावावर मोठी संपत्ती केली आहे. कदाचितच ही सर्व संपत्ती लुलूच्या देखभालीसाठी खर्च होईल. "लुलू आता 8 वर्षांचा आहे. बर्टन म्हणाल्या की, त्या या गोष्टीची काळजी घेतील की, लुलू नेहमी आनंदी राहिल आणि त्याला खूप प्रेम मिळेल."