लंडन : भारतीय बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पळून केलेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याला यूकेमध्ये मोठा झटका बसला आहे. भारतीय बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात दाखल केलेला 1.55 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे दहा हजार 432 कोटी रुपयांचा खटला मल्ल्या हरला.

विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मागे घेण्यास ब्रिटनच्या कोर्टाचे न्यायाधीश अँड्रयू हेनशॉ यांनी नकार दिला. 13 भारतीय बँकांनी मल्ल्याविरोधात फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला होता.

मल्ल्याची जगभरातील संपत्ती गोठवण्याचा आदेश कोर्टाने कायम ठेवला आहे. त्याचप्रमाणे मल्ल्याकडून 10 हजार कोटींची वसुली करण्यास बँकांना परवानगी दिली आहे. इंग्लंड किंवा वेल्समधील कोणत्याही संपत्तीची विक्री किंवा ट्रान्सफर मल्ल्याला करता येणार नाही.

कोणकोणत्या 13 बँकांकडून खटला

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बैंक, फेडरल बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक, इंडियन ओवरसीज बँक, जम्मू-काश्मिर बँक, पंजाब आणि सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ मैसूल, यूको बँक, युनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनँशियल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि.

विशेष म्हणजे या निर्णयावर अपील करण्याची परवानगीही न्यायालयाने मल्ल्याला दिलेली नाही. त्यामुळे मल्ल्याच्या वकिलांना थेट कोर्ट ऑफ अपीलमध्ये याचिका सादर करावी लागेल.